इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निवडणूक लढवण्यासाठीचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे अनेक अडचणीत असलेल्या इम्रान खान यांना आणखीन एक मोठा हादरा बसला आहे. इम्रान खान यांनी मियावली या आपल्या पारंपरिक मतदार संघातून राष्ट्रीय संसदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र इम्रान खान यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरवून ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. अमेरिकेतील पाक दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवलेली गोपनीय कागदपत्रे उघड करून गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खान यांना जामीन मंजूर केला आहे.
इम्रान खान यांच्यावर इतरही अनेक खटले दाखल केले गेलेले आहेत.या सर्व प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. या खटल्यांच्या सुनावणीतूनही इम्रान खान यांना निवडणुकीच्यावेळी सोडण्यात यावे, अशी मागणी पीटीआय पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले गेले असले तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळेच त्यांचे अर्ज फेटाळले गेले आहेत.