- लोणावळा शहरातील स्थिती : आणखी पाच जणांना बाधा
लोणावळा – लोणावळा शहरातील विविध भागातून पाच व्यक्तींना बुधवारी (दि. 22) करोना बाधित आढळून आल्या आहेत. भांगरवाडी विभागातील दोन व्यक्ती, खंडाळा रस्टिक हायलॅंड येथील दोन व्यक्ती आणि गावठाण विभागातील एक व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे लोणावळा शहरातील एकूण करोना बधितांची संख्या आता 40 झाली आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांगरवाडी विभागातील दिव्या हाईट्स सोसायटीमध्ये आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेली त्याची 30 वर्षीय पत्नी आणि 3 वर्षीय मुलीचा करोना चाचणी अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे भांगरवाडी विभागातील आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 झाली आहे. याशिवाय खंडाळा विभागातील रस्टिक हायलॅंड परिसरात करोना पॉझिटिव्ह “वॉचमन’च्या संपर्कात आलेल्या दोन 49 वर्षीय वॉचमनचा करोना चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खंडाळा विभागातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 9 झाली आहे.
पाचवा रुग्ण हा लोणावळा शहरातील गावठाण विभागातील असून, या 28 वर्षीय युवकाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती समजताच नगरपरिषद प्रशासनाने धाव घेत या परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या तसेच या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या “हाय रिस्क’मधील व्यक्तींची माहिती घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
लोणावळा शहरात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 40 झाली आहे. तर शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 24 झाली. आतापर्यंत शहरातील एकूण 13 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून “डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. याशिवाय बुधवारी गवळीवाडा विभागातील करोना बाधित 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने शहरातील करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 झाली आहे.