सासवड – शहरातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा करोनामुळे शनिवारी (दि. 20) मृत्यू झाल्याने पुरंदर तालुक्यातील करोनाचा हा तिसरा बळी ठरला आहे. तर मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क नऊपैकी चौघे, शहरातील एका साडीच्या दुकानातील एकाचा, अशा एकूण पाचजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधितांची संख्या 10 वर तर तालुक्याची संख्या 26 वर पोहोचली आहे.
सासवडमधील एका महिलेला लक्षणे जाणवू लागल्यानंतर सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पुणे येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. आज चौघांसह सापडलेल्या बाजारपेठेतील साडी दुकानामधील एका रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क 8 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. तर या दुकानात कोणकोण येऊन गेले याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.