मुंबई : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत. एवढेच नाही तर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इकडे महाविकास आघडी सरकार पडण्याच्या जोरदार चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शिवसेनेने एक पत्र पाठविले आहे. शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्र पाठवले आहे. शिवसेनेच्या या कृतीला एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे जात थेट आव्हान दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
शिवसेनेने आपल्या पत्रात म्हटलं की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार 22 जून, 2022 रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई 400006 येथे सायंकाळी 05.00 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.