नवी दिल्ली : योगगुरू रामदेव बाबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. आता या भेटीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता रामदेव बाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. तसेच, रामदेव बाबांनी मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी देखील म्हटले.
एकीकडे राज्यात आधीपासूनच खरी शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरु आहे. शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातला हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हटल्यामुळे या वादात अधिकच भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
योगगुरू रामदेव बाबांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आम्ही मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असे सांगितले आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदू धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. आपल्या राजधर्मासोबत ते आपल्या सनातन धर्म आणि ऋषीधर्माचं प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.
“बाळासाहेब ठाकरेंशी आमचे स्नेहसंबंध होते. एकनाथ शिंदे हे त्यांचे मानस आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत असे आम्हाला वाटते. या राजधर्मासोबत सनातन धर्माच्या प्रतिष्ठेबाबत आम्ही संवाद केला. फार चांगलं वाटलं”, असे देखील रामदेव बाबांनी नमूद केले.