जळगाव: राज्यात कडक लॉकडाऊननंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बिल देण्यात आले. त्यामुळे बिल भरताना ग्राहकांची धांदल उडाली. डोळे चक्रवातील एवढे बिल पाहून ग्राहकांनी वितरण कंपनीकडे तक्रारी केल्या. अनेक ठकाणी वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, याचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बसला आहे.
लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना 1 लाख चार हजाराचे बिल आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांना वेठीस धरु नका, नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती, सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करा, अशी मागणी देखील खडसे यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आल्यामुळे त्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. खडसे म्हणाले, लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे.
यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वाढीव वीज बिलाविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. “राज्य सरकारने महावितरण आणि बेस्टसारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल”, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला होता.