कर्जत, (वार्ताहर) – कर्जत तालुक्यातील मोठे वेणगावच्या उत्तरेला दहिवली गावाच्या वेशीवरील शेवटची देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या जाखमाता परिसरात प्राचीन खेळ मंकाळाचे तब्बल अठरा कोरीव पट इतिहास अभ्यासक आणि संशोधक सागर मधुकर सुर्वे आणि नेत्रा गणेश कनोजे यांनी शोधून काढले आहेत. विद्यापीठाचा दहिवली गावाच्या वेशीचा प्रकल्प करत असताना हे दोघे जाखमाता परिसरात संशोधन करण्यासाठी गेले होते.
तेथे त्यांना एका प्रशस्त कातळावर तब्बल अठरा कोरीव पट मिळाले. कर्जत तालुक्यातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे आणि एकाच जागी इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरीव पट पहिल्यांदाच मिळाले आहेत. मागील काही दिवस सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे दहिवली गावाच्या वेशींचा प्रकल्प करत आहेत. त्यासाठी जाखमाता वेशी परिसरात ते संशोधन करत होते.
तिथे जवळच्या टेकडीवर कातळात खोदलेल्या पायऱ्या (पावठ्या) त्यांना आढळल्या. त्यावरून ते गेले असता पुढे असलेल्या कातळावर मंकाळा खेळाचे तब्बल अठरा पट कोरलेले दिसून आले. तात्काळ त्यांनी त्याचे पांढऱ्या रंगाने मार्क करून मितेश डागा यांच्याकडून ड्रोन शूट करून घेतले. जेणे करून त्यावरून त्यांना त्या परिसराचे अधिक संशोधन करता येईल.
या मोहिमेत गौरकामथ गावाचे उपसरपंच व इतिहासप्रेमी योगेश देशमुख यांची मदत झाली. सातवाहन काळात हा मार्ग कल्याणच्या बंदरातून कोंडाणे लेणीकडे जाण्यासाठी होता. दोन हजार वर्षांपूर्वी इथून सार्थवाह, बौद्ध भिक्षू व व्यापारी तांडे कोंडाणे लेणीमार्गे देशावर जात असत. त्याच मार्गावर असलेल्या या प्रचंड मोठ्या कातळावर मंकाळा खेळाचे पट कोरण्यात आले आहेत, असा प्राथमिक अंदाज सागर सुर्वे यांनी वर्तवला आहे.
लाकडी मेटाचेसुद्धा ठिकाण शोधण्यात या दोन अभ्यासकांना यश आले आहे. या संबंधी अधिकचे संशोधन करून त्याचा संशोधन पेपर इतिहास परिषदेत मांडण्याचा मानस सागर सुर्वे व नेत्रा कनोजे यांचा आहे.