- नवीन 858 रुग्णांची नोंद
- चार जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आठशेचा टप्पा ओलांडला. आज नवीन 853 जणांना करोनाची बाधा झाली. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत 1 लाख 12 हजार 370 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 6134 इतकी झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी दुपीा चार वाजेपर्यंत शहरातील 855 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 3 जणांना करोनाची लागण झाली. दिवसभरात 4 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील मोशी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, फुगेवाडी येथील 4 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 473 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 366 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2791 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1491 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1275 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 4859 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 6134 इतकी आहे.
आज पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील तालेरा रुग्णालय परिसरात सर्वाधिक 163 रुग्णसंख्या आहे. तर त्याखालोखाल भोसरी रुग्णालय परिसरात 158, जिजामाता 114, यमुनानगर 110, आकुर्डी रुग्णालय परिसरात 105 रुग्ण आढळले आहेत. तर सांगवी 71, थेरगाव 80 व वायसीएम रुग्णालय परिसरात 53 बाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरामध्ये 4403 जणांना लस देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात 25 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 12) 25 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर, करोनामुक्त झालेल्या 5 जणांना घरी सोडण्यात आले. औंध, कर्वे रस्ता-पुणे, पिंपळे गुरव, सांगवी, ताथवडे, रहाटणी, खडकी, पिंपळे निलख, औंध, राजगुरूनगर, येरवडा, कासारवाडी, मुळशी येथील रुग्णांचा समावेश आहे. कान्हे फाटा (ता. मावळ), नवी सांगवी, बाणेर-पाषाण रस्ता, औंध येथील करोनामुक्त झालेल्या 5 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. रुग्णालयात सध्या 55 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील 14 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 2 हजार 109 रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी 821 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. 178 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 749 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे. तर, 306 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे.