पुण्याहून मुंबईला ‘इंटरसिटी’ रवाना

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेची प्रवासी सेवा मार्च महिन्यापासून बंद होती. मध्य रेल्वेकडून इंटरसिटी सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रदीर्घ “ब्रेक’नंतर शुक्रवारी सायंकाळी पुण्याहून मुंबईला पहिली गाडी रवाना झाली.

करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून प्रवासी सेवा स्थगिती दिली होती. या कालावधीत श्रमिक विशेष, विशेष गाड्यांसह पार्सल, मालगाड्या सोडण्यात येत होत्या. अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने इंटरसिटी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर मुंबई, नागपूर, सोलापूर, गोंदिया आदी मार्गांवर इंटरसिटी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये पुणे-मुंबई-पुणे मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे थांबे आणि वेळापत्रक इंद्रायणी एक्‍स्प्रेस आणि डेक्कन क्वीनप्रमाणे आहे. या गाड्यांना आरक्षण करणे आवश्‍यक आहे. मात्र, सध्या प्रवाशांचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. सात महिन्यांच्या “ब्रेक’नंतर शुक्रवारी सायंकाळी पहिली इंटरसिटी एक्‍स्प्रेस (इंद्रायणी) पुण्याहून मुंबईकडे रवाना झाली. 

“डेक्कन क्वीन’ आजपासून धावणार…
पुणे-मुंबई मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांची लाइफलाइन असणारी “डेक्कन क्वीन’ देखील शनिवारी सकाळी 7.15 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, या विशेष गाड्या असून, त्यांना आरक्षण करणे बंधनकारक असल्याने पासधारक प्रवासी आणि दररोज ये-जा प्रवाशांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.