घरेलू कामगार महिलांना ओळखपत्रांचे वाटप
नगर (प्रतिनिधी) – शहरातील घरेलू कामगार महिलांना अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटीत कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे सभासद ओळखपत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महिलांचे विविध प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन जगताप यांनी दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे, सरचिटणीस गोरख खांदवे, सहसचिव मीना कराळे, अजिंक्य बोरकर, मयुरी वल्ले, मोनाली मोरे, आशा वराडे, सुनीता बडकस, साधना सपाटे, मंगल गरडे, सविता बरकस, अशोक शेडाळे आदी उपस्थित होते.
घरेलू कामगार महिला असंघटीत असल्याने ते आपल्या हक्कापासून वंचित आहे. या असंघटीत कामगारांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटीत कष्टकरी कामगार संघटना प्रयत्नशील आहे.
या कामगार महिलांना बाळंतपणाची रजा मिळून मालकाने पूर्ण पगार द्यावा, घरेलू कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांच्या मुला-मुलींच्या शालेय शिक्षणासह उच्च शिक्षण मोफत मिळण्याबरोबरच आदी विविध मागण्या व त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे यांनी सांगितले.