व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने दिली नोटीस
ग्रामस्थांनी केली संबंधिताच्या चौकशीची मागणी
पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे शिरूर-बेल्हा रस्त्यालगत तालुक्यातच कार्यरत असणाऱ्या एका कृषी सहायकाने जागा खरेदी करून तेथेच गावठी दारूचा अड्डा सुरू केला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने संबंधितास दारू अड्डा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. हा कृषी सहायक नेमका कोणाच्या आशीर्वादाने हा उद्योग करीत आहे, याच्या चौकशीची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.
पारनेर तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत असणाऱ्या एका कृषी सहायकाने राळेगण थेरपाळला शिरूर-बेल्हा रस्त्यालगत कारखिलेवस्ती शिवारात जागा खरेदी केली. तसेच तेथे हॉटेल इमारत बांधून तेथे गावठी दारूचा अड्डा सुरू केला. मागील दोन वर्षांपासून तेथे गावठी व देशी-विदेशी दारूची अवैध विक्री केली जात आहे. परिसरातील ग्रामस्थांना येथे येणाऱ्या तळीरामांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत अनेक ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही संबंधिताला दारू विक्री बंद करण्यास सांगितले.
परंतु माझ्या मालकीच्या जागेत मी काहीही करील, अशी उत्तरे दिली होती. याबाबत ग्रामस्थांनी लोकजागृती सामाजिक संस्थेकडेही त्याची तक्रार केली होती.
या व्यक्तीचा धाबाही असून, त्याबाबत संस्थेने पोलिसांकडे अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कृषी विभागाकडेही या अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
आता राळेगण ग्रामपंचायतीने संबंधिताला दारू विक्री बंद करण्याची नोटीस पाठविली आहे. याशिवाय गावामध्ये इतर ठिकाणीही अनेक दारू अड्डे आहेत. तेही पूर्णतः बंद करण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने पुढाकार घेणार असल्याचे सरपंच पंकज कारखिले यांनी सांगितले.
मला या प्रकरणाची नुकतीच माहिती मिळाली आहे. संबंधित कर्मचारी आमच्या विभागाचा आहे. मात्र त्याने कुठे जागा घेऊन काय व्यवसाय सुरू केला आहे, याबाबत मला कल्पना नाही. संबंधित कर्मचाऱ्याकडे चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
रामदास दरेकर ,तालुका कृषी अधिकारी, पारनेर