पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. हे क्लिनिक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. शहरामध्ये महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सर्वात मोठे आहे. त्यानंतर भोसरी, आकुर्डी व पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय आहे. शहरातील वायसीएम रुग्णालयामध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र, याठिकाणी सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण येतो.
प्रत्येक नागरिकाला त्यांच्या परिसरामध्ये आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात वर्दळीच्या ठिकाणी मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. हे मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना आरोग्याबाबत आवश्यक सुविधा वेळीच आणि जवळच देता याव्यात तसेच पालिकेच्या मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात कोणत्या भागात मोहल्ला क्लिनिक असणे आवश्यक आहे? लोकसंख्येनुसार किती मोहल्ला क्लिनिक असावे? या सर्व बाबी या सर्वेक्षणातून समोर येणार आहेत. शहराच्या विविध भागात मोहल्ला क्लिनिक सुरू केले तर त्या परिसरातील रुग्णांना त्याचा फायदा होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील वैद्यकीय सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. शहराच्या विविध भागामध्ये मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. लवकरच या सर्वेक्षणाचा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल. त्यानुसार शहरामध्ये किती व कोणत्या भागात प्राथमिक उपचार केंद्र असावेत याची माहिती सर्वेक्षणातून मिळेल.
– विकास ढाकणे,
अतिरिक्त आयुक्त