वडापुरी, (वार्ताहर) – दूध दरवाढीची शक्यता मागील महिन्यात मावळल्यानंतर दुधाच्या दरामध्ये दीड ते दोन रुपयांनी कपात झाली होती. यानंतर आता जनावरे बाजारामध्ये देखील त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सातत्याने कमी होत असलेल्या दूध दरामुळे जनावरे बाजारावर मंदीचे संकट घोंघावत आहे.
जनावरांच्या बाजारात संकरित गाईंच्या किमती तब्बल 30 ते 40 हजारांनी खाली उतरल्या असून, जनावरे बाजारात शेतकरी ग्राहकांऐवजी व्यापारीच दिसून येत आहेत. जानेवारी 2024मध्ये दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची दुग्धविकास मंत्र्यांची घोषणा केली होती. त्याचे परिणाम त्यावेळी देखील जनावरे बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये दूध दरात दीड ते दोन रुपयांची कपात झाली.
दरामध्ये कपात होण्यापूर्वी दुधाला 26 ते 27 रुपये दर मिळत होता. आता हा दर 24 ते 25 रुपयांवर आला आहे. असले तरी गेल्या काही दिवसांत पशूखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच दुधाच्या उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. डिसेंबर (2023) महिन्यापासून जनावरे बाजारामध्ये मंदीचे चित्र उभे राहिले आहे. जसजसा सध्या चारा टंचाईचे संकट अधिकाधिक गडद झाले आहे. त्याचाही परिणाम सध्या जनावरे बाजारात दिसू लागला आहे.
गायींच्या किमती घटल्या
आठ महिन्यांपूर्वी 25 ते 30 लिटर प्रतिदिन दूध उत्पादन क्षमता असणारी एक संकरित गाय सुमारे दीड ते पावणेदोन लाखापर्यंत बाजारामध्ये मिळत होती. आज या गायीची किंमत 90 हजार ते 1 लाखापर्यंत आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता व दूध दराची स्थिती लक्षात घेता पुढील काही दिवसांमध्ये जनावरे बाजारामध्ये संकरित गाईंचे दर आणखी कोसळण्याचा धोका आहे.