ढाका – बांगलादेशातील सर्व शिक्षण संस्था 22 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. बांगलादेशातील ज्या विद्यार्थ्यांनी करोना विरोधी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना वर्गांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार आहे, असे बांगलादेशच्या शिक्षण मंत्री दिपू मोनी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान शेख हसिना यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशातील संसर्ग प्रमाण गेल्या काही दिवसात झपाट्याने घटले आहे. त्यामुळे शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बांगलादेशातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार कमिटीनेही देशातील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला होता. ज्या प्रवाशांनी करोना विरोधी लस किमान 14 दिवसांपूर्वी घेतली असेल, अशाना करोनाच्या निगेटिव्ह तपासणीचा अहवाल न मागता देशात प्रवेश दिला जाऊ शकेल, असेही या कमिटीने म्हटले आहे.