61 वर्षांपूर्वीं प्रभात : दारूबंदी दुरुस्ती विधेयक

ता. 04, माहे मार्च, सन 1960

विनोबा भावेकृत “गरिब-श्रीमंतसेवा’

जालंदर, ता. 3 – मी गरिबांप्रमाणेच श्रीमंतांचे कल्याणाचा विचार करतो. या दोन्ही वर्गाची सेवा करणे हे माझे कार्य आहे असे विचार भूदानाचार्य आचार्य विनोबा भावे यांनी काल येथे प्रार्थना सभेत बोलताना व्यक्‍त केले. विनोबाजी म्हणाले, समृद्धी आणि दारिद्य्र यांत वाटा उचलने हे सर्वोदयाचे ध्येय आहे.

समृद्धी वा दारिद्य्र यांचा सर्वांनी सारखाच वाटा उचलला पाहिजे. संपत्तीचा अधिक संचय हे संकट होय. संपत्तीमान माणूसही आपल्या मुलांची भीती बाळगतो. म्हणून त्याचा भार हलका करण्यासाठी त्याची संपत्ती गरजू गरिबांना वाटली पाहिजे. यात दोघांचीही सेवाच घडते.

पॉंडिचेरीतील कायदेपद्धती केव्हा बदलणार?

नवी दिल्ली – पॉंडिचेरीत असलेली कायदा पद्धती बदलणे कितपत शक्‍य आहे याचा विचार सरकार करीत आहे, असे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी भृपेश गुप्ता यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना आज राज्यसभेत सांगितले. पॉंडिचेरीचे सत्तांतर कायदेशीर व पूर्ण झाले म्हणजे तेथील चालू कायदेपद्धतीऐवजी भारतीय कायदेपद्धती सुरू करण्यात येईल.

दारूबंदी दुरुस्ती विधेयक

मुंबई – आज मुंबई विधानसभेत दारूबंदी कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू झाली. बिलाच्या प्रति हाती मिळाल्या नाहीत अशी सभासदांनी तक्रार केल्यामुळे या बिलावरील चर्चा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. डिनेचर्ड स्पिरिट, फ्रेंच पॉलिश, व्हर्निश यांचा उपयोग मद्यपानासाठी म्हणून व्यापक प्रमाणात करण्यात येतो. तेव्हा त्याच्या व्यापाराचे नियंत्रण करावे असा या दुरुस्ती विधेयकाचा उद्देश आहे.

आयुर्विमा कॉर्पोरेशन वृत्तपत्रांत पैसे गुंतवणार?

नवी दिल्ली – वृत्तपत्राच्या विभागात आणि कर्ज रोख्यात आयुर्विमा कॉर्पोरेशन पैसे गुंतविणे इष्ट की अनिष्ट याचा विचार सरकार करील असे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आज लोकसभेत सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.