गांधीजी आणि लेनिन यांचे श्रेष्ठत्व सारखेच
दोघांनीही साम्राज्यशाहीची सत्ता झुगारण्याचे कार्य केले
मुंबई – रशियाचे पंतप्रधान मार्शल बुल्गानीन यांनी आज महात्माजी आणि लेनिन यांची तुलना केली व दोघांचेही श्रेष्ठत्व सारखेच असल्याचा निर्वाळा दिला. महात्माजींबद्दल अशारीतीने प्रथमच धन्योद्गार काढताना मा. बुल्गानीन म्हणाले की, या दोन महान नेत्यांनी वसाहतवादी सत्तेच्या जोखडांतून आपल्या देशातील जनतेची मुक्तता करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारत आणि रशियातील जनतेला शांततेच्या नि समृद्धीच्या मार्गाने आगेकूच करण्याची द्वारे खुली झाली आहेत.
मार्ग भिन्न पण ध्येय एकच – महात्माजी आणि लेनिन यांचे मार्ग जरी भिन्न असले तरी वसाहतवाद विरोधी लढा यशस्वी करण्यात त्यांनी सारख्याच भूमिका वठविल्या आहेत, असे सांगताना मा. बुल्गानीन म्हणाले की, गांधीजींप्रमाणेच लेनिन आमचे नेते होते. या दोघांचा भिन्न तत्त्वज्ञानावर विश्वास होता. परंतु दोघांमध्ये साम्यही पुष्कळच होते. या दोघांनी सुखी भविष्यकाळ कसा निर्माण करता येईल. याची चिंता वाहिली. स्वातंत्र्य संपादनासाठी करावयाच्या प्रयत्नांचा विचार सदैव मनात वागवला. महात्माजींनी ही गोष्ट भारतात केली तर लेनिनने आमच्या देशात नेमकी तीच गोष्ट केली.
आपल्या मैत्रीने जागतिक शांतता दृढतर होईल – मा. बाल्गनीन पुढे म्हणाले, रशियन सरकार आणि जनतेच्या सदिच्छा बरोबर घेऊन आम्ही आलो आहोत. भारत-रशिया मैत्री दृढतर करण्याच्या दृष्टीने आमची ही भेट उपयुक्त ठरेल. भारत-रशिया मैत्री जितकी दृढतर होईल तितकी जागतिक शांतताही दृढ होईल.
पुणेकरांना अंतराळात दिसली आकृती
पुणे – आज सकाळी आकाशात भ्रमण करणाऱ्या एका विचित्र आकृतीमुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. ही आकृती दोन-तीनशे फूट लांब सापाच्या सारखी दिसत होती. या आकृतीचे तोंड एखाद्या रबराच्या चेंडूप्रमाणे होते व त्यामागून जाणारा भाग पांढऱ्या जाड शेपटाप्रमाणे होता.
ही आकृती आकाशात झपाट्याने गिरक्या घेत होती. हा प्रकार एक तासभर चालला होता. याबाबत चौकशी करता असे सांगण्यात आले की, 30 हजार फूट उंचीवरून जाणाऱ्या विमानातून सुटणाऱ्या पांढऱ्या धुरामुळे ही आकृती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे.