दिल्ली वार्ता : जय जयललिता!

– वंदना बर्वे

चार राज्यांच्या विधानसभा आणि एक केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचा चेहरा असले तरी; बुडत्याला काडीचा आधार तसाच तमिळनाडूत भाजपला जयललिता यांचा टेकू घ्यावा लागत आहे.

चित्रपट निर्माती, अभिनेत्री आणि आक्षेपार्ह विधानामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजपच्या उमेदवार खुशबू सुंदर यांनी जयललिता यांचा भव्यदिव्य असा फोटो पोस्टरवर लावला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचा हुकमी एक्‍का आहेत. किमयागार राजकारणी आहेत. आंतरराष्ट्रीय जगात त्यांनी एक ख्याती मिळविली आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताप्राप्ती आणि सत्तांतर घडवून आणण्यात त्यांची बरोबरी करणारा एकही नेता भारताच्या राजकारणात सध्या तरी नाही! देशातील चार राज्यांत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या सर्व राज्यांत मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत. हे सगळं खरं असलं तरी, तमिळनाडू यास उल्लेखनीयरित्या अपवाद आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा आजही तमिळनाडूत बोलबाला आहे. पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे. यातही कहर म्हणजे, जयललिता यांच्या नावाची क्रेझ भाजप उमेदवारांमध्ये आहे.

भाजपने खुशबू सुंदर यांना चेन्नईच्या थाउजंड लाइट्‌स या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. खुशबू सुंदर गाजलेल्या अभिनेत्री आहेत. चित्रपट निर्मात्या आहेत. दोनशेपेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या उलटसुलट विधाने करण्यासाठी ओळखल्या जातात. त्या बोलतात तमिळनाडूत परंतु त्याचे प्रतिसाद संपूर्ण देशात उमटतात.

तमिळनाडूची 16 वी विधानसभा निवडण्यासाठी आज मंगळवार दिनांक 6 एप्रिल रोजी मतदान होणे आहे. राज्यातील सर्व 234 मतदारसंघात एकाच दिवशी निवडणूक होणे आहे. मुख्य सामना दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांच्या पक्षात आहे. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची धुरा पलानीस्वामी यांच्या हाती आहे तर करुणानिधी यांच्या पक्षाची धुरा मुलगा स्टॅलिन यांच्या हाती आहे.

भाजप पुन्हा एकदा तमिळनाडूच्या मैदानात नशीब आजमावत आहे. भाजपने 20 सरदारांना रिंगणात उतरविले आहे. यात प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन हे धारापुरम आणि ज्येष्ठ नेते एच राजा कुराईकुडी येथून निवडणूक लढत आहेत. तर, खुशबू सुंदर या थाउजंड लाइट्‌स या मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत.

तमिळनाडूमध्ये दिवंगत नेत्यांचा प्रभाव पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे याची जाणीव झाली ती खुशबू सुंदर यांच्या प्रचारामुळे. खुशबू सुंदर यांनी आपल्या पोस्टरवर जयललिता यांचा भव्यदिव्य असा मोठा फोटा लावला आहे. महत्त्वाचे म्हणजे, भाजप उमदेवारांच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरणे बंधनकारक आहे. परंतु, खुशबू सुंदर यांच्या पोस्टरवर पंतप्रधानांचा फोटो गायब आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जयललिता यांचा फोटो आवश्‍यक आहे, असे कदाचित समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सांगितले असावे आणि सुंदर यांनी हा निर्णय घेतला असावा.

तमिळनाडूत सध्या जी चर्चा रंगली आहे ती अशी की, निवडणुकीच्या मैदानात भाजपचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असे रालोआचा घटकपक्ष अण्णाद्रमुकला वाटत असावे. भाजपशी हातमिळवणी केल्यापासूनच अण्णाद्रमुकचे सेनापती आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पलानीस्वामी यांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली होती.

अर्थात, अण्णाद्रमुकचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी जे साहित्य उपयोगात आणले जाते त्यावरून मोदी यांचा फोटो काढायला सुरुवात केली होती. खुशबू यांच्याप्रमाणे बहुतांश उमेदवारांनी आपल्या पोस्टरवर पंतप्रधानांऐवजी जयललिता यांचाच फोटो वापरायला सुरुवात केली आहे. अख्खा देश मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत असताना तमिळनाडू मात्र आपल्याच तालावर नाचत असल्याचे दिसून येत आहे.

भाजपविरोधी आघाडी

भारतीय जनता पक्षाला आवर घालण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे. मात्र, दीदींना ज्याप्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा होती तशी अद्याप तरी काही मिळताना दिसत नाही. कारण, धर्मनिरपेक्ष पक्षांची भाजपविरोधी आघाडी आधीपासूनच आहे ती म्हणजे कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी. अशात दीदींनी राष्ट्रव्यापी आघाडी बनविण्याचे आवाहन केले आहे. मुळात, दीदींनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून जे आवाहन मिळत आहे त्याला कंटाळून त्यांनी हे आवाहन केले आहे.

राजकारण “नफा तोटा’ बघून केले जाते. तृणमूल कॉंग्रेस वगळता अन्य कोणत्याही पक्षाला सध्या बंगालच्या राजकारणात रस नाही. अशात अन्य पक्ष भाजपला विरोध करण्यासाठी बंगालमध्ये धावून येतील ही अपेक्षा करणे तसे फोलच.

दीदींनी हे पत्र 28 मार्च रोजी सहा मुख्यमंत्री, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सीपीआई महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांना लिहिले आहे. शरद पवार, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांनी आधीच ममता दीदीला सोबत देण्याचे आश्‍वासन दिले आहे. याशिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीसुद्धा मदतीला धावून येण्याचे कबूल केले आहे. मात्र, भाजपविरोधी आघाडीचा मुद्दा हा फक्‍त बंगालच्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही. या राज्यांचा निकाल येईल त्यानंतर ही मोहीम आणखी जोमात राबविली जाण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.