ज्ञानदीप लावू जगी : ज्ञानेश्‍वरी

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

– गणेशवंदन

ज्ञानेश्‍वरीला सुरुवात करताना ज्ञानेश्‍वरांनी प्रथम श्रीगणेशाला वंदन केले आहे. बुद्धिमत्ता, ज्ञान आणि काव्य या तिन्हींचा तेथे अपूर्व संगम आपल्याला दिसतो. गणेशाचे शरीर, वस्रे, रत्नभूषणे इत्यादी सर्वांना त्यात वैशिष्ट्यपूर्ण साहित्यरूप दिले आहे.

संपूर्ण वेदवाङ्‌मयच अर्थगहन शब्दांनी घडवलेले श्रीगणेशाचे शरीर आहे. हृदयंगम काव्य हे त्यावरचे रंगीत वस्र, तर साहित्यातले अलंकार हे त्या तलम झळकत्या वस्राचे पोत आहे. अठरा पुराणे गणेशाच्या अंगावरचे रत्नजडित अलंकार आहेत. पद्यरचनेच्या कोंदणात जडवलेली तत्त्वरत्नेच तिथे लखलखत आहेत.

काव्य आणि नाटके गणेशाच्या पायातले घुंगुरवाळे होऊन मंजुळ अर्थध्वनीने रुणझुणत आहेत. व्यासादिकांची बुद्धी गणेशाच्या कमरेची मेखला होऊन मिरवते आहे. ज्ञानमध देण्यात उदार अशी दशोपनिषदांची सुगंधी फुले गणेशाच्या मुगुटावर विसलत आहेत. या श्रीगणेशाला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. (ज्ञा. 1/3-20)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.