– स्वप्निल श्रोत्री
हमासच्या हवाई हल्ल्यांपासून इस्रायलचे संरक्षण “आयर्न डोम’ ही इस्रायलची हवाई सुरक्षा प्रणाली करीत आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात “सिप्री’च्या एका अहवालात जगातील तीन आंतरराष्ट्रीय सीमा या सर्वाधिक धोकादायक सीमा म्हणून सांगितल्या आहेत. यात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा अर्थात “एलओसी’, उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया आंतरराष्ट्रीय सीमा अर्थात “33 समांतर लाइन’ आणि इस्रायल-पॅलेस्टीन यांच्या ताब्यात असलेल्या भूभागामधील सीमा यांचा समावेश होतो. इस्रायल आणि हमासमध्ये एक प्रकारचे अघोषित युद्ध सुरू झाले आहे. अशावेळी हमासच्या हवाई हल्ल्यांपासून इस्रायलचे संरक्षण “आयर्न डोम’ ही इस्रायलची हवाई सुरक्षा प्रणाली (एअर डिफेन्स सिस्टम) करीत आहे.
हवाई सुरक्षा प्रणाली म्हणजे काय?
युद्धाच्या काळात राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली शहरे (उदा. : राजधानी) कायमच शत्रूराष्ट्राचे मुख्य लक्ष्य असतात. अशावेळी शत्रूराष्ट्राच्या हवाई हल्ल्यापासून देशातील महत्त्वाच्या शहरांचे रक्षण करण्यासाठी हवाई सुरक्षा प्रणालीचा वापर केला जातो. साधारणपणे हवाई सुरक्षा प्राणाली ही “मोबाइल’ (एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी नेणे शक्य असणे) जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली सुरक्षा प्रणाली असते.
जेव्हा शत्रूराष्ट्राचे एखादे विमान, रॉकेट, ड्रोन, यूएव्ही किंवा इतर कोणतेही हवाई साधन किंवा अस्त्र या सुरक्षा प्रणालीच्या रडारमध्ये येते, तेव्हा त्यातून मानवाद्वारा किंवा स्वयंचलित क्षेपणास्त्र डागले जाऊन शत्रूकडून येणारा हल्ला हवेतच नष्ट केला जातो. ज्यामुळे अमूल्य अशा राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होते.
आयर्न डोमची वैशिष्ट्ये
आयर्न डोम ही इस्रायलची हवाई सुरक्षा प्रणाली असून अमेरिका व इस्रायल यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आली आहे. आयर्न डोम ही “मोबाइल’ जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली प्रणाली असून त्याची मारक क्षमता 4 ते 70 किमी इतकी आहे. इस्रायल लष्कराच्या म्हणण्यानुसार 2011 ते 2021 या 10 वर्षांच्या काळात आयर्न डोमने हमासचे एक हजारपेक्षा जास्त रॉकेट हवेत नष्ट केले असून त्यांची अचूकता ही 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
इस्रायलने भारताला 2016 साली आयर्न डोम संबंधित विचारणा केली होती. परंतु, आयर्न डोमची मारक क्षमता कमी असल्याने भारताने ती घेतली नाहीत. सध्या भारत व इस्रायल “बराक-8′ या हवाई सुरक्षा प्रणालीवर एकत्रित काम करीत असून ती लवकरच दोन्ही देशांच्या लष्करात सामील होईल.
भारताच्या सुरक्षेसाठी “पृथ्वी’
मागील काही काळापासून भारताची सुरक्षा ही “पृथ्वी’ संरक्षण प्रणाली करीत आहे. वातावरणाच्या बाहेर जाऊन आलेला हल्ला परतवून लावण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र 5 मॅक अर्थात हायपरसोनिक ( 1 मॅक म्हणजे साधारणपणे 1195 किमी/तास) वेगाने जाऊ शकते. 80 किमीचा पल्ला असलेले भारतीय बनावटीचे हे अस्त्र जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी वापरतात.
एस-400 : जगातील सर्वोत्तम प्रणाली
रशियन बनावटीची “एस-400′ ही मोबाइल हवाई सुरक्षा प्रणाली जगातील सर्वोत्तम प्रणालींपैकी एक आहे. “एस-400’ची मारक क्षमता 400 किमीपर्यंत असून ही प्रणाली एकाच वेळी 100 पेक्षा जास्त हवाई हल्ले हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे. सध्या रशियाची सुरक्षा “एस-400′ करीत असून लवकरच भारत, टर्की, बेलारुस व सौदी अरेबिया या यादीत सामील होतील.
सर्वोत्तम हवाई सुरक्षा प्रणाली
1) पेट्रीओट : अमेरिकेच्या लष्करात असलेली पेट्रीओट हवाई सुरक्षा प्रणाली अत्यंत आधुनिक असून सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांसाठी सक्षम आहे. उत्तर कोरियाच्या संभाव्य अण्वस्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 2018 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपान सीमेवर पेट्रीओट तैनात केली होती.
2) एचक्यू-9 : चिनी बनावटीची ही सुरक्षा प्रणाली सध्या चिनी लष्कराच्या (पीएलए) सेवेत असून तिसऱ्या पिढीतील सर्वोत्तम प्रणाली मानली जाते. “एचक्यू-9’चे वैशिष्ट्य म्हणजे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांबरोबरच कमी उंचीवरून येणारा हवाई हल्ला सहज परतावून लावू शकते.
3) फलक : इराणी लष्कराच्या सेवेत असलेली फलक सुरक्षा प्रणाली ही अत्यंत आधुनिक सुरक्षा प्रणाली आहे. 2019 मध्ये अमेरिका व इराण मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्कराने फलकची तैनाती इराणच्या सीमेवर केली होती. हॉर्मझच्या खाडीत अमेरिकेचे ड्रोन पडल्यामुळे फलक 2019 मध्ये चर्चेचा विषय बनली होती.
भारताची सुरक्षा किती?
भारताला पाकिस्तान व चीन या दोन्ही राष्ट्रांकडून कायमच धोका राहिला असून ही दोन्ही राष्ट्रे लष्करीदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे आपली सुरक्षा ही भारताची प्राथमिकता राहिली आहे. सध्या भारताच्या सेवेत पृथ्वी आणि ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टिम असून लवकरच रशियन बनावटीची “एस-400′ भारतीय लष्करात सहभागी होईल. याशिवाय “बराक-8’च्या निर्मितीसाठी भारत व इस्रायल यांच्यात संयुक्त प्रकल्प सुरू असून भारताची अमेरिकेशी इतर सुरक्षा प्रणालींसदर्भात बोलणी चालू आहेत.