खोटी तार पाठवून अध्यक्षास अटक; दडपण आणून राजीनामा
मालदीव बेटांतील क्रांतीचे स्वरूप
कोलंबो, ता. 10 : मालदीव ह्या जगातील सर्वात लहान आणि अगदी अलीकडच्या लोकसत्ताक राष्ट्राचे पहिले अध्यक्ष अमीन दिदी ह्यांस सध्या धोनिद् नावाच्या एका झोपडीत कडक पहाऱ्यात बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मालदीव बेटात क्रांती होऊन उपाध्यक्ष महमद दिदी ह्यांनी अध्यक्षांस राजीनामा देण्यास भाग पाडले.
क्रांती कशी झाली?
ता. 2 सप्टेंबर रोजी सीलोनमध्ये असलेले अमीन दिदी ह्यांना त्यांचे एक जवळचे नातलग फार आजारी आहेत अशी तार मिळाली. एका ब्रिटिश विमानांतून ताबडतोब निघून माले ह्या राजधानीच्या बेटावर ते उतरले.
बनावट तार
ही तार बनावट होती. विमानांतून उतरताच त्यांना लोकसभा इमारतीत नेण्यांत आले व जबरदस्ती करून त्यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा लिहून घेण्यात आला. नंतर त्यांना अटक करून धोनिद् येथे नेऊन ठेवण्यात आले. त्यांनी तेथे अन्नपाणी वर्ज्य केले असून ते फक्त चहा घेत आहेत असें तेथून येथे आलेल्या हिंदी व्यापाऱ्यांकडून कळते. पदच्युत अध्यक्षांस लौकरच माले पासून 200 मैल दूर अशा एखाद्या छोट्या बेटावर पाठविण्यांत येईल. त्यांना सोबत म्हणून त्यांचे काही जवळचे नातलगही तेथे पाठविण्यात येतील. त्यांची ही अटक बेमुदत आहे.
अस्पृश्यता पाळणाऱ्यांना शिक्षा देणारे बिल
पुणे – अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना शिक्षा देणारे बिल तयार होत असल्याचे नुकतेच हिंदी लोकसभेत गृहमंत्री डॉ. काटजू यांनी सांगितले आहे. या बिलातील कलमांचा विचार करण्यासाठी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या येथील काही कार्यकर्त्यांची एक सभा झाली.
या बिलाचा मसुदा आता लोकमत अजमावण्यासाठी प्रसृत करण्यात आलेला आहे. त्या बिलाचा समग्र विचार करून एक निवेदन तयार करण्यासाठी अस्पृश्य कार्यकर्त्यांनी एक समिती नेमली आहे. या समितीचे श्री. पा. ना. राजभोज हे अध्यक्ष आहेत. श्री. बी. सी. कांबळे आणि श्री. के. एस. चानवडा हे दोघेजन त्या समितीचे सभासद आहेत.