पेशावर – पाकिस्तानच्या संगमरवर खाण दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर पोहचली आहे. त्या दुर्घटनेनंतर आणखी 7 कामगार बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाण सीमेलगतच्या डोंगरात संगमरवराचे साठे आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात खाणकाम चालते.
तेथील खाणीत सोमवारी रात्री माती आणि दगडांचा ढिगारा कोसळला. त्या दुर्घटनेत 19 जण ठार झाले. ढिगाऱ्याखालून काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. काही जखमींच्या निधनामुळे मृतांचा आकडा वाढला आहे.
दरम्यान, प्रांतिक सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 9 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. संबंधित दुर्घटनेमुळे पाकिस्तानच्या खाणींमधील सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.