सरकारने खासगी व्यवसायाला अधिक ढिले सोडण्याची अपेक्षा
नवी दिल्ली, ता. 29 – सरकारच्या आर्थिक धोरणात काही बदल आणि फेरफार केले तर सरकारी योजनाकाराच्या कल्पनेपेक्षा त्वरेने औद्योगिक वाढ घडवून आणणे शक्य होईल असे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या फेडरेशनने आपल्या ठरवात म्हटले आहे. या ठरावात म्हटले आहे की, व्यक्तिगत बचत वाढली तर संयुक्त विकासाचा व्यापक पाया भक्कम होतो तेव्हा व्यक्तिगत बचत व्यक्तीच्या हाती राहील आणि वाढेल अशा तऱ्हेने सरकारने आपले धोरण बदलले पाहिजे.
ऑस्ट्रेलियात बालविवाहास बंदी
सिडने – बालविवाहाना प्रतिबंध करणारे विधेयक ऑस्ट्रेलियन सरकार मांडणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांत विवाहासाठी मुलाचे व मुलीचे किमान वय अनुक्रमे 14 व 12 वर्षे आहे. आता किमान
18 व 16 वर्षे करणार आहे.
तंत्रशिक्षण इंग्रजी भाषेतच चालू राहावे
कोईमतूर – तंत्रविज्ञानातील परदेशी प्रगतीबरोबर आपणासही राहता यावे यासाठी तांत्रिक विद्येचा संस्थांतून इंग्रजीतूनच शिक्षण चालू राहावे असे केंद्र सरकारने नेमलेल्या पदव्युत्तर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रो. एम. एस. थॅकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाची सोपी स्वस्त पुस्तके उपलब्ध होणे आवश्यक आहे.
प्राचीन खजिन्याचा शोध
अम्मान – कोट्यवधी रुपयांचा प्राचीन खजिना हुडकून काढण्यास एक ब्रिटिश पथक प्रयत्न करणार आहे. ह्या खजिन्यात इतर वस्तूंबरोबरच सॉलोमनच्या मंदिरातील 200 टन सोने चांदीही असल्याचे समजते. मध्यपूर्वेतील मृत समुद्राच्या नैऋत्येस खेरबेत कुम्राणपाशी एक प्राचीन लेख 1952मध्ये सापडला त्यात या खजिन्याचा उल्लेख आहे. इसवीसनानंतर 66व्या वर्षी सादूक या ज्यू राज्याच्या थडग्यात हा खजिना गाडण्यात आला.