– माधव विद्वांस
कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत वसंत आबाजी डहाके यांचे आज अभिष्टचिंतन. लेखक, भाषातज्ज्ञ, कोशकार, अभिनेते तसेच चित्रकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील “बेलोरा’ या गावी शेतकरी कुटुंबात 30 मार्च, 1942 रोजी झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथे झाले. तेव्हापासून ते कविता करीत असत. “त्या दगडी, भंगलेल्या तटाच्या जुनाट ऐतिहासिक शहरात’ या कवितेतून त्यांनी आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीतून मनात आलेल्या व्यथा प्रकट केल्या आहेत.
त्यांची “एक आगळा पक्षी’ ही कविता महाविद्यालयात पहिल्या वर्षाला असताना प्रसिद्ध झाली. वर्ष 1964 मध्ये ते एमए झाले. त्यानंतर वर्ष 1965 पासून त्यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे मराठीच्या अध्यापनास प्रारंभ केला. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, चंद्रपूर तसेच अमरावती येथे मराठी विषयाचे अध्यापन केले. अध्यापन करीत असताना त्यांनी “त्रिशंकू’ या लघुनियतकालिकाचे सहसंपादन केले. वर्ष 1982 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी मराठीचे अध्यापन केले. वर्ष 1994 मध्ये “राज्य मराठी विकास संस्थे’त त्यांनी उपसंचालक म्हणून धुरा सांभाळली.
वर्ष 1966 मध्ये त्यांची “योगभ्रष्ट’ ही प्रदीर्घ कविता प्रसिद्ध झाली व वास्तववादी कवी म्हणून त्यांची साहित्यक्षेत्रात ओळख निर्माण झाली. त्यानंतर “योगभ्रष्ट’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1972 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांतून पिचलेल्या समाजाच्या व्यथा, भावना, जीवनातील दाहक सत्य व्यक्त होते. या पहिल्या कवितासंग्रहाचा “द टेरेरिस्ट ऑफ द स्पिरीट’ या नावाने इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला.
वर्ष 1987 मध्ये त्यांचा “शुभवर्तमान’ हा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहाला वर्ष 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला.
“शुभवर्तमान’मधील कवितांमधून सामाजिक परिस्थितीचे वास्तववादी वर्णन केले आहे. “आविष्कार’ या संस्थेने त्यांच्या “स्वागत कोसळत्या शतकाचे’ या कवितांचे नाट्यरूप दर्शन घडविले. अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेल्या जी. ए. कुलकर्णी यांच्या “कैरी’ या दीर्घकथेवर आधारलेल्या चित्रपटात डहाके यांनी अभिनय केला आहे. त्यांनी ललित लेखनाबरोबर शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश तसेच वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश यांचेही संपादन केले आहे. “मराठी नाटक आणि रंगभूमी- विसावे शतक’ या ग्रंथात नाटक आणि रंगभूमी या संदर्भात वेळोवेळी लिहिल्या गेलेल्या लेखांचे संकलन केलेले आहे.
त्यांच्या “शुनःशेप’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाने विशेष पुरस्कार दिला तसेच डहाके यांना 2009 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. शांता शेळके पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार व सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. चंद्रपूर येथे फेब्रुवारी 2012 मध्ये झालेल्या 85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या कन्या राही डहाके या इंग्रजी लेखिका व अनुवादक आहेत.