वस्तुस्थिती मान्य करा! अटलजींचे अब्दुल्ला यांना आवाहन
श्रीनगर, ता. 23 – वस्तुस्थिती मान्य करा, असे आवाहन जनसंघ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी शेख अब्दुल्ला व त्यांच्या चेल्यांना केले. काश्मीरचे सामिलीकरण पक्के असल्याचे सांगून ते म्हणाले, “काळ व्यक्तीसाठी थांबत नाही.’ श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशीही मागणी वाजपेयी यांनी केली.
अमेरिका-रशिया यांची मैत्री दृढ होत आहे!
वॉशिंग्टन – गेल्या वर्षी मॉस्कोत रशिया-अमेरिका मैत्रीस प्रारंभ झाला आणि तो दृढ होत आहे, असे सोव्हियत कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस ब्रेझनेव म्हणाले. अमेरिका-रशिया अण्वस्त्र विषयक करारानंतर ब्रेझनव यांनी हे निवेदन केले. त्यांनी सांगितले, निक्सन व मी सतत संपर्क ठेवणार आहे.
मुरी येथे लवकरच भारत-पाक यांच्या वाटाघाटी
नवी दिल्ली – भारत व पाकिस्तान यांच्यातील पुढील वाटाघाटी रावळपिंडीच्या उत्तरेकडील “मुरी’ येथे लवकरच होतील, असे पाकिस्तानचे अध्यक्ष जनाब झेड. ए. भुट्टो यांनी सांगितले. याविषयी पाकिस्तान रेडिओने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, ही मुलाखत भुट्टो यांनी लाहोर येथे दिली. लाहोर येथे भुट्टो म्हणाले, मुरी बैठकीत तत्त्वांच्या चौकटीत राहून तडजोड घडविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करील.
इराक-भारत कराराचे वृत्त खोटे
नवी दिल्ली – इराकी वैमानिकांना रशियन मिग चालविण्याचे शिक्षण देण्याविषयी इराक-भारत करार झालेला नाही, असे आज परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले. “वॉशिंग्टन पोस्ट’ ने इराक-भारत करार झाल्याचे वृत्त दिले होते. ती बातमी असत्य व गैरसमज पसरविणारी आहे. भारतीय बनावटीची “नॅट’ विमाने विकत देण्याविषयी करार झाला ही वार्ताही खोटी आहे.