संसदेचे अधिवेशन अवैध
नवी दिल्ली, दि. 29 – संसदेच्या ज्या आणीबाणी अधिवेशनात 39वी घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आली, ते अधिवेशन बेकादेशीर होते, असे प्रतिपादन आज सर्वोच्च न्यायालयात शांतिभूषण यांनी केले. निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचे वर्गीकरण करणे व त्यापैकी काहींच्या निवडणुकीस आव्हान देता येणार नाही व न्यायालयीन छाननी करता येणार नाही अशी तरतूद करणे, म्हणजे घटनेच्या एका मूलभूत तत्त्वाचे उल्लंघन आहे. हे तत्त्व म्हणजे कायद्याने दिलेली समानता असे उद्गार शांतिभूषण यांनी काढले.
उमेदवारांचे वर्गीकरण करण्यास शंभर कारणेही असू शकतात. देशातील पेचप्रसंगामुळे ते (वर्गीकरण) आवश्यक ठरू शकते. लोकशाहीच्या हितासाठीही ते आवश्यक ठरू शकते, असे ऍटर्नी जनरलनी म्हटले.
आंध्र प्रदेशात वेठबिगारीस बंदी
हैदराबाद – आंध्र प्रदेश सरकारने एका वटहुकूमान्वये राज्यात वेठबिगारीच्या पद्धतीवर बंदी घातली आहे. वटहुकूमात म्हटले आहे की, या आधी याबाबत झालेले सर्व करार रद्द समजण्यात येतील. कर्ज न फेडल्याबद्दल तुरूंगात असलेल्यांची सुटका करण्यात येईल.
पेरूचे अध्यक्ष वेलॅस्को पदच्युत
लिमा – जनरल ज्युआन वेलॅस्को यांना पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदावरून दूर करण्यात आल्याने आज पेरूच्या राष्ट्रीय नभोवाणीवरून जाहीर करण्यात आले. सैनिकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्याचा ताबा घेतला आहे. लवकरच नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल.