बिहारात विद्यापीठांना पुन्हा स्वायत्तता
पाटणा, दि. 22 – बिहारचे मंत्री जगन्नाथ मिश्रा यांनी काल विद्यापीठांसंबंधीचे नवे वटहुकूम काढले. या हुकमान्वये विद्यापीठांची स्वायत्तता पुन्हा मान्य करण्यात आली आहे. विद्यापीठातील मंडळाचे लोकशाहीकरण व विद्यापीठाच्या प्रशासनाला नवा अर्थ प्राप्त करून देण्यात आला आहे. 1972 मध्ये राज्यसरकारने विद्यापीठांचा कारभार आपल्या ताब्यात घेतला होता.
5 जून रोजी संपूर्ण क्रांतिदिन
पाटणा – येत्या 5 जून रोजी “संपूर्ण क्रांतिदिन’ पाळा व त्या दिवशी प्रत्येक खेडेगावात “जनता सरकार’ स्थापन करा, असा आदेश जयप्रकाश नारायण यांनी दिला आहे.
स्वा. सावरकरांचे मुंबईत स्मारक
मुंबई – मुंबईत दादर येथे 50 लक्ष रुपये खर्च करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या 6650 चौरस मीटर जागेत स्मारक समितीने स्मारकाचा काही भाग उभारला आहे. त्याचे उद्घाटन 28 तारखेला गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे.
वीजपुरवठ्यावर नवे निर्बंध
मुंबई – महाराष्ट्र सरकारने एका आदेशाद्वारे उद्योगांसाठी व शेतीसाठी होणाऱ्या वीजवापरावर नवे निर्बंध जारी केले. तीव्र वीजटंचाईच्या संदर्भात हे निर्बंध लागू करण्यात आले असून त्वरित अंमलात येत आहेत.