लोकशाहीत कायदे बदलता किंवा दुरूस्त करता येतील
नवी दिल्ली, दि. 17 – लोकशाहीत कायदे दुरूस्त करता येतील किंवा बदलता येतील, पण कुणाला कायदेभंग करू दिला जाणे शक्य नाही, असे उद्गार माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी लॉशन्स क्लबच्या बैठकीत बोलताना सांगितले.
ना. शुक्ला पुढे म्हणाले, देशहितापुढे आपला वैयक्तिक स्वार्थ, आवडी, निवडी दुय्यम होत. आम्ही राष्ट्रापुढचे ध्येय गाठण्याचा अवघड मार्ग पकडला आहे. तो खडतर असेल, पण अधिक सुलभतेचा मार्ग आता अवलंबिणे शक्य नाही. कारण आता काळाचा अपव्यय शक्य नाही. येत्या काही वर्षांत देशाच्या अर्थव्यस्थेत क्रांतिकारी बदल होतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा असे बदल होतात तेव्हा ते भांडवलवाल्यांना रूचत नाहीत.
लिबियात क्रांतीचा प्रयत्न
कैरो – लिबियाचे हुकूमशहा महंमद गडाफी यांच्या विरूद्धचा क्रांतीचा प्रयत्न फसल्याचे वृत्त इजिप्तच्या वृत्तपत्रांनी दिले आहे. गेल्या महिन्यात गडाफी यांच्या विरूद्ध झालेला हा चौथा कट आहे. सत्तारूढ 11 सदस्यांच्या क्रांतिकारी मंडळानेच हा क्रांतीचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. इस्रायलशी कुठल्याही प्रकारचा समझोता करण्यास लिबियाचा विरोध असल्याने लिबिया व इजिप्तचे मतभेद विकोपाला गेले आहेत.
10+2+3 अभ्यासक्रमावर चर्चा
नवी दिल्ली – शालेय अभ्यासक्रमात नवी पद्धत निर्माण झाली आहे. 10 इयत्ता+2+3 असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या पहिल्या 10 वर्षांत कोणता अभ्यासक्रम ठेवावा यावर चर्चा करण्यासाठी येथे निरनिराळ्या राज्यांतून 200 प्रतिनिधी येथे येणार आहेत. या बैठकीत राज्य सरकारे, माध्यमिक शाळाबोर्डे व माध्यमिक शिक्षक यांचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत.