अंतराळ मोहिमेनंतर आता अमेरिकेचा मंगळावर मोर्चा
वॉशिंग्टन, दि. 10 – रशियाच्या साहाय्याने ऐतिहासिक अंतराळ मोहिमेनंतर अमेरिकेने आपल्या संशोधनाचा मोर्चा आता मंगळाकडे वळविला आहे. मंगळावर जीवसृष्टी आहे का, याचा शोध घेण्यासाठी “नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेतर्फे दोन उपग्रह सोडले जाणार आहेत. पहिला येत्या सोमवारी व दुसरा त्यानंतर दहा दिवसांनी सोडला जाईल. व्हायकिंग-1 व व्हायकिंग-2 अशी त्यांची नावे आहेत. 8 कोटी 15 लक्ष किलोमीटर्स प्रवास करून हे उपग्रह पुढील वर्षी जुलैच्या सुमारास मंगळावर उतरतील.
सरकारी कचेऱ्यांच्या वेळामध्ये फरक होणार
मुंबई – मुंबईतील सरकारी कचेऱ्यांच्या वेळा पाळीपाळीने ठेवण्यावर एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.
दीर्घायुषी लोकांत पुरुषांची संख्या अधिक
कलकत्ता – भारतातील दीर्घायुषी लोकांत पुरुष अधिक आहेत, असे लखनौ विद्यापीठातील प्रा. कृपाल सिंग सूदन यांनी केलेल्या एका पाहणीवरून दिसून आले आहे. या पाहणीत असे आढळले की, पुरुष हे स्त्रियांपेक्षा दीर्घायू आयुष्य जगतात; 55 ते 59 या वयोगटात 36.22 टक्के पुरुष व 33.50 टक्के स्त्रिया आहेत. 60 ते 64 वयोगटात 26.32 टक्के पुरुष व 25.45 स्त्रिया आहेत. 65 ते 69 वयोगटात 17.51 टक्के पुरुष, तर 17.49 टक्के स्त्रिया आहेत.
रेल्वे स्टेशनवरून 9 हजार भिकारी हाकलले
मुंबई – मध्य रेल्वेने जुलै महिन्यात मुंबई, लोणावळा व पुणे विभाग येथील रेल्वे स्टेशन्सवरून 9 हजार भिकाऱ्यांची हकालपट्टी केली. तसेच फेरीवाले व अनाधिकृतरित्या रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या 900 जणांवर खटले भरले आहेत.