दुसऱ्या अणुस्फोटाची भारताची तयारी? न्यूजवीकचा अंदाज
न्यूयॉर्क, दि. 12 – आणखी एक अणुस्फोट करण्याची भारताची तयारी चालू आहे, असे “न्यूजवीक’ या साप्ताहिकाने हेरखात्याच्या माहितीचा हवाला देऊन म्हटले आहे. जीनिव्हा परिषदेत अणुस्फोटावर पाच वर्षे बंदी घालण्याच्या करारावर चर्चा चालू आहे. त्याविषयी आढावा घेतला जात आहे. त्या परिषदेत हजर राहणाऱ्या एका अमेरिकन अधिकाऱ्याने सदर बातमीविषयी म्हटले आहे. “शिष्टाचार म्हणून ते (भारत) ही परिषद संपेपर्यंत थांबतील (स्फोट करणार नाहीत) अशी मला आशा वाटते’ या अधिकाऱ्याचे हे उद्गारही “न्यूजवीक’ या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याबाबत भारताने काहीही उत्तर दिलेले नाही.
स्त्री-पुरुष संघर्ष मुळात चुकीचाच
वाई – “स्त्रीचे स्थान घरातच आहे. पुरुषाने बाहेर जाऊन अर्थार्जन करावे व स्त्रीने घर सांभाळावे अशी कामाची वाटणी झालेली आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष संघर्षाचा प्रश्न उद्भवत नाही. स्त्री ही जन्मतः त्यागी आहे. तिचे जीवन म्हणजे आत्मयज्ञ आहे. ती शरीराने नाजूक आणि कोमल असली तरी निर्माण करण्याची शक्ती तिच्यात आहे. तिच्या प्रेमात आणि तिरस्कारात अपूर्व शक्ती आहे. तिच्याप्रमाणे प्रभावित होऊन पराक्रम करणाऱ्या थोरांच्या अनेक कथा इतिहासात वाचायला मिळतात. तद्वत तिने केलेल्या तिरस्कारामुळेही एखादा सामान्य तुळशीदास संतांच्या मालिकेत जाऊन बसतो. स्त्री ही अशी शक्ती आहे, असे विचार समाजसेविका कुसुमताई नाईक यांनी येथील वसंत व्याख्यानमालेत “स्त्री-जीवन शक्ती’ या विषयावर बोलताना मांडले.