“”डोन्ट अंडर-एस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन..!” शाहरुख खानचा हा प्रसिद्ध डायलॉग श्रीलंकेतील सद्यःस्थिती पाहून आठवणं स्वाभाविक आहे. “कॉमन मॅन’ मुका असतो हे खरं; पण तो सदासर्वकाळ मुकाच राहील असं गृहित धरण्याचं कारण नाही. वेळ आल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या गराड्यात असणाऱ्या नेत्यांनाही तो सोडत नाही.
सर्वोच्च पदावरील व्यक्तीलासुद्धा मोजक्या सुरक्षा रक्षकांसह हेलिकॉप्टरमधून राहतं (पेटतं) घर सोडून परागंदा व्हावं लागतं. एखाद्या चोराला भरचौकात पकडून “महाप्रसाद’ द्यावा, त्या थाटात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ठोकून काढणारा “कॉमन मॅन’ श्रीलंकेत दिसला. पोटाला करकचून चिमटा बसला, तर कॉमन मॅनचा असा विराट आणि विध्वंसक अवतार दिसतो, जो सुरक्षा व्यवस्था कोणत्या दर्जाची आहे याकडे ढुंकूनही न पाहता केवळ “टार्गेट’वर प्रहार करतो. मागेपुढे धावणारे चार कमांडो सोबत मिळाले म्हणजे आपल्याला अमरपट्टा मिळाला, असं कुणी समजण्याचं कारण नाही.
“कॉमन मॅन’ची ही शक्ती कुठे आणि कशी पाहायला मिळेल, हे सांगता येत नाही. श्रीलंकेत परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेल्यामुळे ती विध्वंसक स्वरूपात बघायला मिळाली एवढंच! परंतु ही शक्ती विधायक स्वरूपातही प्रकट होते, हे एखाद्या संकटाच्या घडीला दिसून येतं. एरवी नाकासमोर चालणारा “कॉमन मॅन’ संकटाच्या वेळी असं काम करून दाखवतो, जे त्यानं आयुष्यात त्यापूर्वी कधीच केलेलं नसतं.
चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीसारख्या मोजक्या संकटांचं भाकित करता येतं. बऱ्याच वेळा संकट पाऊल न वाजवता येतं. समजा आपण विमानातून प्रवास करीत आहोत आणि पायलटच बेशुद्ध झाला तर..? अशा वेळी जितक्या तीव्रतेनं पाय लटलटतील तितक्या तीव्रतेनं पायलटची किंमत कळेल. नीट विचार केला तर असा प्रसंग घडणं अशक्य नाही, हे लक्षात येईल. रुपेरी पडद्यावरचा आपला आवडता अभिनेता प्रसंगी हेलिकॉप्टरसुद्धा चालवू शकतो, हा भाग वेगळा; परंतु प्रत्यक्षात कॉकपिटमध्ये पाऊल ठेवायचं धाडस “कॉमन मॅन’ कधीच करणार नाही.
फ्लोरिडात हा चमत्कार प्रत्यक्ष घडला. विमान कसं चालवतात, याबद्दल काहीही माहिती नसलेल्या एका प्रवाशानं जवळजवळ 70 मैल विमान चालवलं आणि मुख्य म्हणजे त्याचं यशस्वी लॅंडिंगसुद्धा केलं. पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 70 मैलांवर उड्डाण करीत असलेल्या एका विमानाचा पायलट अचानक बेशुद्ध पडला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातल्या (एटीसी) कर्मचाऱ्यांना प्रवाशांचं बोलणं ऐकू आलं आणि त्यावरून पायलट बेशुद्ध पडलाय, हे समजलं. आपण नेमके कुठे आहोत, हे प्रवाशांना ते नेमकेपणानं सांगता आलं नाही. फक्त समोर किनारपट्टी दिसत असल्याचं एका प्रवाशानं सांगितलं. त्याला कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची सूचना एटीसीनं केली.
हे विमान बारा आसनी होतं आणि आता पायलटच्या सीटवर “कॉमन मॅन’ बसला होता. एटीसीकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे किनाऱ्यालगत तो विमान चालवत राहिला. विमानतळाच्या टप्प्यात विमान आल्यानंतर लॅंडिंग कसं करायचं, याची माहिती त्या प्रवाशाला दिली गेली आणि त्यानं हे अवघड कामही अचूकपणे केलं आणि विमानतळावर उपस्थित असलेले प्रशिक्षित पायलटसुद्धा आचंबित झाले. संकट “कॉमन मॅन’च्या काळजात धडकी भरवतं तशीच हिंमतही भरतं, याचा हा भक्कम पुरावा!