उपाहारगृहांतील दर 15 टक्क्यांनी उतरणार
पुणे, दि. 18 – पुण्यातील उपाहारगृहांतून आषाढी एकादशीपासून सर्व पदार्थ 15 टक्के कमी दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तूंत चहा, मिसळ, इडली, सांबार, वडा सांबर, बटाटावडा, पावसॅंपल, उत्तप्पा, पुरीभाजी, भजी व उपवासाच्या पदार्थांचा समावेश आहे. आज या पदार्थांचा दर साधारण 35 पैसे ते 60 पैसे कप वा एक प्लेट असा आहे. पुण्यात 1200 उपाहारगृहे असून त्यातील 70 टक्के उपाहारगृहांत उपरोक्त खाद्यपदार्थ विकले जातात. खाद्यपदार्थांचे भाव आणखी कमी केले जातील तसेच सर्व उपाहारगृहांत दर्शनी भागात भावफलक लावले जातील.
“आर्यभट्ट’चे तीन महिने यशस्वी परिभ्रमण
बंगलोर – पहिला भारतीय उपग्रह आर्यभट्टने पृथ्वीभोवती तीन महिने परिभ्रमण केले आहे, असे भारतीय उपग्रह संचालक केंद्राचे प्रमुख प्रो. यू. आर. राव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 3 महिन्यांच्या अवधीत आर्यभट्टने पृथ्वीभोवती 1350 फेऱ्या पूर्ण केल्या.
अंतराळात रशिया-अमेरिका भेटीगाठी व सहभोजन
स्पेस सेंटर, ह्युस्टन – “अपोलो’ व “सोयूझ’ यानांतील अंतराळवीरांनी आज परस्परांच्या यानांत ये-जा केली, एकमेकांच्या भेटी घेतल्या व एकत्र भोजनही घेतले. उद्या दोन्ही याने पुन्हा अलग होणार असून पुन्हा एकत्र जोडण्याचा प्रयोग करण्यात येईल. अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेतील.