अंतराळात रूसो-अमेरिकन अंतराळवीरांचे हस्तांदोलन
केप कॅनाव्हेराल, (फ्लॉरिडा) दि. 7 – रशिया व अमेरिका यांची संयुक्त अंतराळ मोहीम सुरू होत आहे. पाच वर्षांपूर्वी अशक्य समजली जाणारी ही ऐतिहासिक महत्त्वाची घटना आता घडत आहे. सोयूझ आणि अपोलो हे दोन्ही देशांचे अंतराळयान उड्डाण करतील. या मोहिमेत भाग घेणाऱ्या अमेरिकन अंतराळवीर थॉमस स्टॅफर्ड आणि रशियन अंतराळवीर ऍलेक्सी लिओनोव्ह हे अंतराळात हस्तांदोलन करतील.
मोटार वाहतुकीचे दर कमी होणार
नवी दिल्ली – देशातील मोटार वाहतूक दर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन मोटार वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांना दिले आहे. मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकवर असणारी बंधने दूर केल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन या नेत्यांनी केले.
बर्फखंड वितळू लागले समुद्राची पातळी वाढणार
ओटावा – कॅनेडियन शास्त्रज्ञांचे मते दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात बर्फ वितळू लागले असून बर्फाचे मोठे खंड एकमेकांपासून अलग होऊ लागले आहेत. ते समुद्रात पडण्याचा संभव आहे. त्यामुळे जगभरच्या समुद्राची पातळी वाढेल. ही वाढ 20 टक्क्यांपर्यंत जाईल. मागे हडसनच्या उपसागरात बर्फ ढासळला व कॅनडाचा काही प्रदेश जलमय झाला होता. दक्षिण ध्रुव प्रदेशात जो बर्फाचा प्रदेश आहे तो युरोप खंडाएवढा मोठा आहे. काही ठिकाणी त्याची जाडी 5 किलोमीटर आहे.
किती व्यायाम जरूर आहे हे दाखविणारे यंत्र
नवी दिल्ली – जर्मन शास्त्रज्ञांनी घड्याळाप्रमाणे एक नवीन यंत्र तयार केले आहे. हृदय विकाराचा झटका येऊ नये यासाठी माणसाला किती व्यायाम करणे आवश्यक आहे, हे मोशन मीटरमध्ये कळते.