चलनविषयक स्थिती चांगली
नवी दिल्ली, दि. 1 – देशातील परकीय चलनविषयक स्थिती या वर्षी सर्वसाधारणपणे चांगली राहील. तरीही भारताने जागरूक राहावयास हवे, कारण ज्यांचा अंदाज येणार नाही अशा अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे, असे उद्गार आर्थिक व्यवहार सचिव एम. जी. कौल यांनी काढले. पॅरिस बैठकीत भारताला 1775 कोटी डॉलर्सची मदत देण्याचे मान्य केले आले.
कॅनडाकडून फक्त अन्न मदत
नवी दिल्ली – एम. जी. कौल म्हणाले, कॅनडाला भारताचे अणुशक्तीविषयक धोरण काही बाबतीत मान्य नाही म्हणून केवळ अन्नविषयक मदतच देत आहे, इतर बाबतीत नाही. अमेरिकेनेही कर्जनिवारणासाठी मदत देताना अडचण असल्याचे कळविले आहे.
लोकसेवेचे व्रत स्वीकारताना प्रसिद्धीलोलूप होऊ नये
फलटण – आजचा तरुण एखाद्या संघटनेत जेव्हा काम करतो, त्यावेळी तो चांगला वागतो. पण व्यक्तिगत व्यावहारिक जीवनात तो बरे वागत नाही, अशी व्यथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, तरुणाने निर्व्यसनी राहून स्वयंपूर्ण व स्वावलंबी वृत्तीने वागून कार्य करावे. हे करत असताना समाजाला व देशाला विघातक असे काहीसुद्धा तरुणाचे हातून घडू नये. लोकसेवेचे कार्य करताना प्रसिद्धीची हाव धरू नका, चांगल्या कामास नेहमी आपोआप प्रसिद्धी मिळते. झुणका भाकर केंद्रामार्फत चाललेल्या कार्याचे अनुकरण महाराष्ट्रातील तरुण वर्गाने अवश्य करावे, असे पुरंदरे म्हणाले.