ब्रिटन, अमेरिकेची लोकशाही आदर्श मानणे हास्यास्पद
नवी दिल्ली, दि. 7 – ब्रिटन व अमेरिकेतील लोकशाही आदर्श मानून भारताने तिचे अनुकरण करावे असे म्हणणे हे हास्यापद आहे, असे उद्गार अ. भा. कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार ए. आर. अंतुले यांनी काढले.
सदर दोन देशातील लोकशाहीची कार्यवाही व तेथील लोकशाहीची संस्था यातील अनेक उणिवांची उदाहरणे देऊन ते म्हणाले, केवळ लोकशाहीच्या नावाखाली काही गोष्टी या दोन देशांत घडल्या म्हणून ते देश काही खरेखुरे लोकशाहीवादी होत नाहीत. पाश्चिमात्य देशातील प्रत्येक गोष्ट चांगली व आपल्या देशातील प्रत्येक चांगली गोष्ट वाईट आहे, असे आपल्याकडील लोक “उसणे’ निकष लावून ठरवतात.
आचार्य विनोबाजींचे उपोषण रद्द
पवनार – आचार्य विनोबा भावे यांनी गोहत्याबंदीसाठी असलेली आपली मोहीम आज मागे घेतली. एका लेखी निवेदनाद्वारे त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आभार मानले आहे. आचार्य 11 सप्टेंबरपासून आपला नेहमीचा आहार घेण्यास सुरुवात करतील. गेल्या एप्रिलपासून त्यांनी नेहमीचा आहार घेणे बंद केले आहे.
आपला हा निर्णय आज आश्रमात विनोबाजींनी जाहीर केला. ते म्हणाले, “उपोषण मागे घेतले आहे’. विनोबाजींनी आपले आंदोलन मागे घेतल्यामुळे 11 सप्टेंबर त्यांच्या वाढदिवसापासून ते सुरू करणार असलेले बेमुदत उपोषणही रद्द करण्यात आले आहे. याची घोषणा विनोबाजींनी आकाशवाणीवरून दिली.