अमेरिका पाकला बॉम्बर विमाने देणार
न्यूयॉर्क, दि. 17 – भारतापासून पाकिस्तानच्या सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी ए-7 जातीची 110 बॉम्बर विमाने पाकिस्तानला विकण्यात यावीत, अशी शिफारस फोर्ड सरकारच्या संरक्षण विभागाने केली असल्याचे अधिकृतरित्या समजते. ही विमाने एकदा इंधन भरल्यानंतर 1080 किमी अंतरावर जाऊन परत येऊ शकतात.
…ते आश्वासन फोल ठरणार
1975मध्ये भारताच्या विरोधाला न जुमानता अमेरिकेने जेव्हा पाकिस्तानवरील शस्त्रपुरवठा बंदी उठविली होती तेव्हा असे सांगितले होते की, भारतीय उपखंडात शस्त्रस्पर्धेस उत्तेजन देण्याचा वा लष्करी समतोल बिघडवण्याचा अमेरिकेचा हेतू नाही. मात्र भारताचा बराच मोठा भाग या विमानाच्या “माऱ्याच्या क्षेत्रात’ येणार आहे. त्यामुळे अमेरिकेने दिलेले आश्वासन फोल ठरणार आहे.
चीनचा वातावरणामध्ये अणुस्फोट
मुंबई – चीनने आज वातावरणात अणुस्फोट केला या अणुस्फोटाची क्षमता 2 ते 3 मेगाटन टी. एन. टी. इतकी होती. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हा स्फोट करण्यात आला. येथील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील नियंत्रक केंद्रात चीनने केलेल्या अणुस्फोटाचे संदेश स्पष्टपणे मिळाले.