थायलंडमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतली
बॅंकॉक, दि. 6 – लष्कराने बंड करून आज थायलंडमध्ये अकस्मात सत्ता ताब्यात घेतली. तत्पूर्वी सशस्त्र पोलीस व डाव्या गटाचे विद्यार्थी यांच्या दरम्यान बॅंकॉकच्या थॉमसॉट विद्यापीठात रक्तपात झाला. सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्करी संघटनेने देशात “मार्शल लॉ’ लागू केला आहे.
ही संघटना स्वतःला “प्रशासन पुनर्उभारणी समिती’ असे म्हणविते. घटना व राजकीय पक्ष विसर्जित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. घोषणेत असेही सांगण्यात आले की, संपर्क माध्यमातील अनेकांनी सत्ता ताब्यात घेणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
नत्रयुक्त खतांच्या वाढत्या वापराने कर्करोगाचा धोका?
लंडन – जगभर नत्रयुक्त खंतांचा वापर वाढत असून त्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा अधिक प्रसार होण्याचा धोका आहे, असे येथील एका संशोधन केंद्राने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
त्यात म्हटले आहे की, या खतांच्या वापरामुळे नायट्रोजनची जी ऑक्साइड्स बाहेर पडतात, ती हवेत मिसळून हवेतील ओझोन वायूशी त्यांची प्रक्रिया होते व त्यामुळे ओझोन नष्ट होतो. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून रक्षण करण्यासाठी ओझोनचा उपयोग होतो, त्याचे प्रमाण जर असे कमी झाले, तर या किरणाची प्रखरता वाढून कर्करोग अधिक फैलावण्याची शक्यता आहे.