48 वर्षांपूर्वी प्रभात | अल्बेरुनीची एक हजारावी जयंती

ता. 15, माहे जून, सन 1973

बड्या राष्ट्रांनी सत्ता समतोलाचे धोरण सोडलेले नाही

नवी दिल्ली, ता. 14 – पंतप्रधान इंदिरा गांधींनी युगोस्लाह टेलिव्हिजनला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अलिप्त राष्ट्रांना असा इशारा दिला की, सत्ता समतोलाचे जुने तत्त्व अद्यापही बडी राष्ट्रे अवलंबित आहेत. त्यापासून त्यांनी सावध राहावे. युरोपात व आशियात शांतता स्थापन करण्याचे प्रयत्नांबरोबर छोट्या राष्ट्रांना सशस्त्र करण्याचे धोरणही ही राष्ट्रे अंमलात आणीत आहेत.

जगाचे पदयात्री : दोन तरुण दिल्लीत

नवी दिल्ली – डेव्हिड व पीटर क्रुन्स्ट हे दोन अमेरिकन विद्यार्थी जगाचा पायी दौरा करण्यासाठी निघाले आहेत. ते सोमवारी दिल्ली येथे आले. युनोच्या बालक निधीमागील तत्त्वांचा प्रचार करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पत्रकारांशी बालताना डेव्हिड म्हणाला, जगाचा पायी दौरा आजवर कोणी काढला नाही. 1970 च्या जूनमध्ये ही कल्पना मूर्त स्वरूपात आली.

रशियन कलाकारांना भारत कसा दिसतो?

मॉस्को – काही वर्षांपूर्वी भारतास भेट देऊन गेलेल्या रशियन कलाकारांनी “मॉस्को फ्रेंडशिप हाऊस’ मध्ये चित्रकलेचे प्रदर्शन भरविले होते. “भारतास भेट दिल्यावर येथील सहयोगी माणसे व निसर्ग पाहून आश्‍चर्यकारक देशाबद्दल प्रचार करावा. या हेतूने हे प्रदर्शन भरले आहे’, असे मत या प्रदर्शनात भारतीय कलाकृती पेश करणाऱ्या डिमिथी या कलाकाराने व्यक्‍त केले आहे. या चित्रांमध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचीही व्यक्‍तिचित्रे आहेत तसेच भारतीय जीवनाचे अनेक पैलू दाखविणारी चित्रेही आहेत.

अल्बेरुनीची एक हजारावी जयंती

काबूल – सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व इतिहासकार अल्बेरुनी यांची 1000 वी जयंती येत्या शनिवारी अफगाणिस्तानमध्ये साजरी होणार आहे. भारत व अफगाणिस्तान हे दोन देश एकमेकांना ज्यावेळी ओळखत देखील नव्हते त्यावेळी अल्बेरुनी यांनी भारतास भेट दिली होती. त्यांनी भारताबद्दलची मौल्यवान माहिती आपल्या पुस्तकात नमूद केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.