जीवनगाणे : आनंदी मन

-माधुरी तळवलकर

आजूबाजूला पुष्कळ प्रतिकूल गोष्टी घडताहेत. पण त्यात बदल करणे आपल्या हातात नसेल तर उगाच मन उदास करण्यात काय अर्थ आहे? मुळात आपला आनंद व सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून ठेवायचेच कशाला? आपला आनंद आपल्या हृदयात असतो. तो जाणून घेता आला पाहिजे. 

एका छोट्या मुलीची गोष्ट खूपच प्रभावी आहे. एक आजी आणि तिची नात एका रानात राहत होत्या. मुलीचे नाव होते रत्ना. आजूबाजूला फारशी घरे नव्हती. करमणुकीची काही साधने नव्हती. पण रानात पुष्कळ पक्षी यायचे. हरीण, ससे यायचे. प्राणी, पक्षी यांना आता त्या आजीची आणि रत्नाची सवय झाली होती. पक्षी सुंदर गाणी गायचे; त्याप्रमाणे ही मुलगीही आवाज काढून त्यांना प्रतिसाद द्यायची. पाणकोंबडे, बदके यांच्याशी ती हितगुज करायची, खेळायची.

एक दिवस त्यांच्या अंगणात अचानक एक मोर आला. दोघीजणी आनंदल्या. मोराने आपला सुंदर पिसारा उघडला आणि थुईथुई नाचू लागला. वा! रत्ना भलतीच खूश झाली. तीही त्याच्यासमवेत नाचू लागली. थोड्या वेळाने मोर पुन्हा रानात गेला. दुसऱ्या दिवशी रत्ना त्याची वाट पाहू लागली. मोर आला. पुन्हा पिसारा फुलवून डौलात फिरू लागला. रत्नाही त्याच्यासारखीच एकेक पाय उचलून, हात उंचावून नाचू लागली. थोड्या वेळाने मोराने आपला पिसारा मिटला आणि निघून गेला. “उद्या ये बरं का, नक्‍की!’ रत्नाने त्याच्या अंगावरून हात फिरवीत सांगितले.

मोर आता रोज येऊ लागला. तो येताच त्याच्यासमवेत नाचून रत्ना मजा करायची, आनंद लुटायची. एक दिवस मोर आलाच नाही. असे कसे झाले? रत्ना त्याची फार उत्सुकतेने वाट पाहात होती. तिला त्याच्यासमवेत नृत्य करायचे होते. संध्याकाळ झाली. मोर काही आला नाही. रत्ना हिरमुसली. आजी म्हणाली, “मोर नाही आला तर काय झाले? तुला तर नृत्यातून आनंद मिळतो ना? त्यासाठी मोराची कशाला वाट बघायची? तू नृत्य कर. मी पाहते. मला आनंद दे तुझ्या नृत्यातून.’

रत्नाला असे झाले होते, कधी नाचते; तिला आजीचे म्हणणे पटले. तिने नृत्य करायला सुरुवात केली. अंगणभर फिरली. आजी कौतुकाने पाहात होती. दोघी रात्री सुखाने झोपल्या. दुसऱ्या दिवशी आजी म्हणाली, “चल, तुला नृत्य करायचेय ना?’ रत्नाने आनंदाने नाचायला सुरुवात केली. मग तेव्हापासून तिचा आनंद मिळवण्यासाठी ती रोज नृत्य करू लागली. आजी आपल्याकडे पाहतेय का, मोर आला का; तिला कशाचीही आठवण नसे. तिला कळले होते, “आपला आनंद आपल्याजवळच आहे.’ रत्नाप्रमाणेच आपले मनही असेच आनंदी होण्यासाठी उत्सुक आहे. आपण त्याची हाक ऐकली पाहिजे. आतून येणाऱ्या आनंदाला प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यातून आपल्याभोवतीचा परिसरही प्रसन्न करायला हवा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.