नोंद : मार्ग खडतर; मात्र आशा जिवंत

-डॉ. जयदेवी पवार

कोविड-19 पासून बचावासाठी जगाला स्वस्त आणि प्रभावी लसी मिळाल्या तरी याचा अर्थ यापुढे येऊ शकणाऱ्या साथरोगांचा धोका टळला, असा होत नाही. जंगली जनावरांच्या शरीरांमध्ये वास्तव्यास असलेले असंख्य विषाणू कोविड-19 सारखी मोठी साथ कधीही आणू शकतात.

करोनाच्या विशाल जाळ्यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यावर काहीतरी उपाय म्हणजेच औषध किंवा लस विकसित होणे. तरच या संसर्गाचा प्रसार जगाला रोखता येऊ शकेल. सध्या अनेक देशांमध्ये लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, झटपट लस शोधून काढणे वाटते तेवढे सोपे नसते, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही.

साथरोगाच्या सात महिन्यांत 130 ठिकाणी लसींसाठी प्रयोग सुरू झाल्याच्या बातम्या समोर आल्या. सध्या जगभरात किमान 88 ठिकाणी लशीवर निदान अवस्थेच्या पूर्वीचे संशोधन सुरू आहे. यातील 67 लसींच्या वैद्यकीय चाचण्या पुढील वर्षाच्या (2021) अखेरीस घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. लसींच्या या शर्यतीत जी सर्वांत आघाडीवर दिसत आहे, ती लस एका जैव-चिकित्सकीय सिद्धांतावर आधारित आणि निर्मित लस आहे. परंतु कोणत्याही एका प्रणालीवर, विशेषतः जी यशस्वी असल्याचे आतापर्यंत सिद्ध झालेले नाही, अशा प्रणालीवर सर्वच भिस्त ठेवण्यात अर्थ नाही, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.

त्यामुळेच वॉशिंग्टन विद्यापीठातील विषाणूतज्ज्ञ डेव्हिड वेस्लर असे म्हणतात की, “सर्वच अंडी एकाच टोपलीत ठेवणे इष्ट नाही.’ मार्च महिन्यात डॉ. वेस्लर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नॅनो कण असलेली एक लस तयार केली होती. त्यातील प्रत्येक नॅनो कणावर स्पाइक प्रोटीनच्या टोकाच्या साठ प्रती जोडल्या आहेत. या नॅनो कणांमध्ये पूर्ण स्पाइक प्रोटीन शृंखलेऐवजी त्याचे बाहेरच्या बाजूला आलेल्या टोकदार भागांचा वापर केला आहे. हे टोकदार भागच आपल्या शरीरात शिरल्यानंतर आपल्या पेशींच्या संपर्कात येतात. ही लस एका मजबूत प्रतिकारशक्‍तीला प्रेरित करू शकते. जेव्हा हे नॅनो कण उंदरांच्या शरीरात सोडण्यात आले, तेव्हा त्यांच्या शरीरात करोना विषाणूसंदर्भात जोरदार अँटिबॉडीज प्रतिक्रिया दिसून आली. जेव्हा या उंदरांना करोना विषाणूच्या संपर्कात आणण्यात आले, तेव्हा त्यांना संसर्ग झाला नाही आणि हे उंदीर संसर्गापासून सुरक्षित असल्याचे दिसून आले. या यशस्वी प्रयोगानंतर डॉ. वेस्लर आणि नील किंग या त्यांच्या सहकाऱ्याने स्थापन केलेल्या आइकोसावॅक्‍स या कंपनीतर्फे आता लवकरच नॅनो कणाच्या लसीच्या चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत.

अमेरिकी लष्कराच्या वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी एका स्पाइक-टोक असलेल्या नॅनो कणाची लस तयार केली आहे आणि तिच्याही चाचण्या सुरू आहेत. शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीत अँटिबॉडीज हे अन्य अवजारांप्रमाणेच एक महत्त्वाचे हत्यार आहे. टी-रक्‍तपेशीही त्यातील एक असून, या पेशी विषाणूमुळे संसर्गित झालेल्या पेशींना खाऊन टाकतात. ब्राझीलच्या साओ पावलो इन्स्टिट्यूटमधील संशोधकाच्या म्हणण्यानुसार, “संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणती प्रतिकार प्रणाली योग्य ठरू शकते, हे आज आपल्याला माहीत नाही.’ केवळ अँटिबॉडी प्रतिक्रिया प्रेरित करणाऱ्या लसी दीर्घ कालावधीसाठी कुचकामी ठरण्याची शक्‍यता आहे.

एखादी लस आपल्या शरीरात कोणत्या मार्गाने जाते, यावरही तिचा प्रभाव अवलंबून असतो. सध्या ज्या लसींच्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत, त्या सर्व स्नायूंमध्ये टोचल्या जात आहेत. एन्फ्लूएन्जावर सर्वांत प्रभावी ठरलेली लस (फ्लुमिस्ट) ही नाकावाटे फवारली जाते.  ही प्रणाली करोना विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी आहे. कारण हा विषाणूही श्‍वसनमार्गातूनच आपल्या शरीरात शिरतो. नाकातील फवाऱ्याद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीच्या बाबतीत सर्वाधिक कल्पक प्रयोग न्यूयॉर्कच्या कोडॉजेनिक्‍स या कंपनीने केला आहे. ही कंपनी अशा एका लसीच्या चाचण्या घेत आहे, ज्यात करोना विषाणूच्या सिंथेटिक आवृत्तीचा वापर केला जात आहे. पिवळा ताप किंवा अन्य प्राणघातक आजारांवरील लसींचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अनेक दशकांपासून लसीसाठी कमकुवत केलेल्या विषाणूंचा यशस्वी वापर केला आहे. कमकुवत विषाणू तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ कोंबड्या अथवा अन्य प्राण्यांच्या पेशींमध्ये तो संवर्धित करण्याचा प्रयोग परंपरेने करीत आले आहेत; परंतु ते विषाणू तरीही मानवी पेशींमध्ये शिरण्याइतके सक्षम असतात. त्यांचे केवळ प्रजनन मंद होते, एवढेच. परिणामी ते माणसाला आजारी पाडू शकत नाहीत.

या कमकुवत विषाणूंचा छोटा डोस रोगप्रतिकारशक्‍तीसाठी एक शक्‍तिशाली उत्प्रेरक म्हणून काम करतो. अपेक्षेप्रमाणे कमकुवत जीवित विषाणू असणाऱ्या लसींची संख्या कमी आहे. कारण त्या तयार करणे हे जटिल काम आहे. याचे यश चाचण्या आणि त्रुटी यांवर आधारित असते, हेही यामागील एक कारण आहे. निष्क्रिय विषाणूच्या लसी तयार करण्यासाठी बऱ्याच अवघड निकषांची पूर्तता करावी लागते. लसीसाठी वापरलेले सर्वच्या सर्व विषाणू कमकुवत किंवा निष्क्रिय आहेत, याची निश्‍चिती असावी लागते. वाल्नेवाच्या लसीने हे निकष आधीच पूर्ण केले आहेत; परंतु चिनी लसीच्या बाबतीत कुणालाच काही ठाऊक नाही. त्यामुळेच ब्रिटनने वाल्नेवाच्या लसीचे सहा कोटी डोस आधीच खरेदी करून ठेवले आहेत.

चीनची अनहुइ जोइफी, फ्रान्सची ऑक्‍सिवॅक्‍स आणि अमेरिकेची व्हीबीआय अशा अनेक कंपन्या करोना विषाणूशी लढण्यासाठी लस विकसित करीत आहेत. या लसी माणसाला अशा विषाणूंच्या समूहांपासून सुरक्षितता प्रदान करतील, ज्यांनी मानवजातीला अजूनही संक्रमित केलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.