-हिमांशू
तुम्ही संतापलेले आहात तर आम्हीही संतापलेलो आहोत. तुम्हाला सर्वसामान्य गोरगरिबांची फिकीर आहे तर आम्हालासुद्धा आहे. तुम्ही कुठेतरी सत्ताधारी आहात तर आम्हीही कुठेतरी सत्ताधारी आहोतच! आम्हाला निर्णय घेता येत नाहीत तर तुम्हालाही निर्णय घेता येत नाहीत. आम्हाला सर्वसामान्यांच्या खिशाची पर्वा नाही असं म्हणता, मग तुम्हाला तरी कुठे आहे?
आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ तुम्ही आणलीत एवढं लक्षात ठेवा. आम्ही नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे असतो. एक काळ असा होता, जेव्हा केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार असायचं. त्यामुळं सत्ताधारी कधीच आंदोलनासाठी रस्त्यावर दिसायचे नाहीत. आता मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार. कारण इकडे आम्ही सत्तेवर असलो तरी तिकडे तुम्ही आहात. आमची तिकडे सत्ता असली तरी इकडे तुमची आहे. दोघेही कुठेतरी विरोधकांत आहोत, म्हटल्यावर लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे परमकर्तव्य आहे… तुमचं आणि आमचंही!
भले प्रश्न निकाली निघाला नाही तरी चालेल; पण रस्त्यावर आलंच पाहिजे. घसा सुकेपर्यंत घोषणाबाजी केलीच पाहिजे आणि वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांची गर्दी झालीच पाहिजे. विजेचा खर्च लोकांच्या आवाक्याबाहेर का गेला? अव्वाच्या सव्वा बिलं लोकांनी का भरायची? पेट्रोल, डीझेलचे दर इतके कसे वाढले? वाहतूकदर वाढल्यावर एकंदर महागाई भडकेल, याचं भान नको का?
चला, आपण दोघेही रस्त्यावर उतरूया. दोघेही एकमेकांना प्रश्न विचारूया. दोघात एक करार करूया. आमच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं द्यायची नाहीत आणि तुमच्या प्रश्नांना आमच्याकडून उत्तर मिळेल अशी अपेक्षा करायची नाही. कारण प्रश्न तुमचे किंवा आमचे नसून सर्वसामान्य जनतेचे आहेत. विजेचे दर कितीही वाढले तरी तुम्हाला आणि आम्हाला ते परवडतात. पेट्रोल पंपावर “टाकी फुल कर,’ अशी ऑर्डर सोडताना ना तुम्हाला धडकी भरते ना आमच्या छातीत धडधडतं. आपल्याला रस्त्यावरून आणि हवेतून फिरवणाऱ्या वाहनांमध्ये भरल्या जाणाऱ्या इंधनाची फिकीर आपल्याला कधीच करावी लागली नाही आणि लागणार नाही.
आपल्या निवासस्थानांचं खर्चिक नूतनीकरणसुद्धा आपोआप होतं आणि त्याचं वीजबिलसुद्धा आपोआप भरलं जातं. नाहीच भरलं तर कुणीही वीज तोडायला येत नाही. म्हणूनच हे प्रश्न तुमचे-आमचे नाहीत. ते सामान्य जनतेचे आहेत. आपल्या पाठोपाठ बिचारी तीही रस्त्यावर येते आणि बेंबीच्या देठापासून कोकलते. तुमच्यामागे येणारे आमचा निषेध करतात आणि आमच्यामागे येणारे तुमचा निषेध करतात. जे रस्त्यावर येत नाहीत ते सोशल मीडियावरून आपला उद्धार करतात. वाट्टेल ते शब्द वापरतात. पण कितीही गलिच्छ बोललं तरी मनाला लावून घ्यायचं नाही!
तुम्हाला कुणी सांगितलं, लोकांना वीजबिल कमी करून हवंय? तुम्हाला कुणी सांगितलं लोकांना पेट्रोलच्या चढ्या दरांचा त्रास होतो? त्यांना फक्त आमचा किंवा तुमचा त्रास होतो हल्ली! तुम्ही तुमचे लोक आमच्यावर सोडा. आम्ही आमचे लोक तुमच्यावर सोडू. त्यांना एकमेकांकडे बघून कडाकडा बोटं मोडूदेत, शिव्याशाप देऊदेत. मोकळं होऊदेत; रिलॅक्स होऊदेत! आंदोलन तुमचं असो वा आमचं… दोन्ही केवळ कुकरच्या शिट्ट्या आहेत. वाफ निघून गेली, की मग तुम्ही आणि आम्हीही बिनधास्त!