जननशास्त्रातील नवा शोध
वॉशिंग्टन, ता. 7 – प्रा. आर. अलेक्झांडर ब्रिंक या अमेरिकन जनन शास्त्रज्ञाने आनुवंशिकतेचे संक्रमण करणाऱ्या जीवघटकांसंबंधी संशोधन केले असून तो जननशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा व मूलभूत शोध म्हणून मानला जाण्याचा संभव आहे,’ असे नॅशनल सायन्स फाउंडेशन या संस्थेने म्हटले आहे. क्ष-किरण यासारख्या बाह्य शक्तींनी घडवून आणलेला बदल सोडल्यास दुसऱ्या कोणत्याही बाह्य शक्तींमुळे जीव घटकांत फेरबदल करता येणे शक्य नाही असा दीर्घ कालापासून जो एक समज दृढ होऊन बसला त्याला या शोधामुळे धक्का बसणार आहे. जीवघटकांच्या या चमत्कारास “जीवघटकांचे व्यक्तिमत्त्व’ असे संबोधण्यात येते आणि “या मूलभूत समजा’वरील दृढ विश्वास “हा’ आधुनिक जनन शास्त्रातील सर्व संशोधनाचा पाया आहे.
संशोधनाचे स्वरूप – एखाद्या जीव घटकाचे मूल स्वरूप हे पिढीमागून पिढी गेली तरीही सतत आहे तसेच राहते आणि क्वचितच व योगायोगाने त्यात फरक होतो असे वरील संस्थेने म्हटले आहे. “त्यानंतर बदल झालेल्या नव्या जीव घटकाचे स्वरूपही जवळजवळ अनिश्चित कालपर्यंत तसेच चालू राहते. परंतु फेरबदल घडवून आणणारी एखादी घटना पुनः अचानकपणे घडून आल्यास या जीवघटकात आणखीही फरक होण्याची शक्यता राहील. जीव घटकांच्या व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या या मूलभूत सिद्धांताला स्पष्टपणे ज्यामुळे बाध आला असे पहिले उदाहरण नुकतेच घडून आले असल्याचे फाउंडेशनचे म्हणणे आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाचे प्रा. आर. अलेक्झांडर ब्रिंक यांचेकडे या संशोधनाचे श्रेय जाते.
सीमा वाद वाटाघाटीने सुटेल
संयम राखा-चळवळ आवरा
मुंबई – सीमा प्रकरणी संयम राखावा आणि मुंबई-म्हैसूर राज्यांचे सीमेचा वाद वाटाघाटीने सोडविण्यास अवसर द्यावा, असे अर्थमंत्री डॉ. मेहता यांनी सरकारच्या टीकाकारांना आवाहन केले. आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हैसूरच्या मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या. भारत सरकारही या कामी लक्ष घालित आहे, असे ते म्हणाले.