संडे स्पेशल : रोहतांग पास… (भाग-3)

-अश्‍विनी जगताप-घाडगे

आता येणार होता आमच्या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे “रोहतांग पास’. याला “डेडली पास’ असंही म्हटलं जातं. हा वाहन चालविण्याच्या दृष्टीने सर्वात जास्त कठीण असलेल्या रस्त्यांपैकी एक आहे. रात्री पाऊस पडून गेल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल आणि दगड माती होती. चिखलामुळे चाक घसरत होतं. जीव मुठीत घेऊन सावकाश बाईक चालवत, त्यातच मागे बसून फोटोज काढत (माझी हौस जपत) निसर्गाचं हे अजून एक रूप अनुभवत आम्ही अखेरीस धुक्‍याने भरून गेलेल्या रोहतांग पासवर पोहोचलो.

हिमालयात बाईकर्स बाईक चालवतात ते वेगाचे थ्रील अनुभवण्यासाठी नव्हे, तर समुद्रसपाटीपासून कैक हजार फूट उंचीवर, खडतर प्रतिकूल परिस्थितीत तग धरून निसर्गाचा आस्वाद घेत, बाईक चालवून आनंदाचा परमोच्च बिंदू गाठण्यासाठी त्यांचा हा सगळा अट्टहास असतो. येथे पोहोचून ध्येय गाठल्याची जाणीव झाली; पण सोबतच इथे येऊन एक गोष्ट लक्षात आली की, हा प्रवास जितका वाटतो तितका सोपा नाही बरं!

रोहतांग पासपासून प्रवासात नवनवीन आव्हाने यायला सुरुवात झाली. कधी रस्ता पूर्ण चिखलाचा, तर कधी पूर्ण खड्ड्यांचा, ज्यांना चुकवणं अशक्‍य होतं. कधी कडक ऊन, तर कुठे हलक्‍या पावसाच्या सरी, कुठे उन्हाचे चटके तर कुठे धुळीचे लोट, या सगळ्याला तोंड देत आम्ही तंडीमधील पेट्रोल पंपावर पोहोचलो. इथून पुढे 360 किमीपर्यंत दुसरा कोणताही पेट्रोल पंप नसल्याने शक्‍यतो लोक इथे बाईकची टाकी पूर्ण भरून सोबत 2 कॅनही भरून घेतात.

ऑक्‍सिजनची कमतरता असल्यामुळे पूर्ण प्रवासात खूप पाणी प्यायचा सल्ला आमच्या ग्रुप हेडने दिलेला असल्याने पाणी तर खूप प्यायलो, पण लघुशंकेचं काय? म्हटलं पेट्रोल पंपावर असेल प्रसाधनगृह, तर तसंही काही नाही. तेव्हा जाणवलं की मुलींसाठी हा प्रवास किती आव्हानात्मक असू शकतो. तिथून निघालो पण रस्त्यात एकही रेस्टॉरंट, हॉटेल किंवा ढाबाही दिसेना. त्यात खडतर रस्ते आणि थंड हवेने परिस्थिती अजूनचं कठीण होत चाललेली.

आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे हेही थोड्या वेळासाठी विसरून गेलेले मी कसंबसं स्वतःला समजावत अखेरीस एका लहानशा धाब्यावर पोहोचलो आणि मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. फ्रेश होऊन तिथून निघालो. निसर्गाचा इतका हिरवा रंग मी त्या दिवशी पहिल्यांदाच अनुभवला. अशा सुंदर निसर्गाचा आनंद घेत किलोंग, जिस्पासारखी सुंदर गाव पाहात आम्ही सर्चूला जात होतो. कडक ऊन होतं आणि अचानक एका तलावाकडे नजर गेली. त्याचं नाव होतं “दीपक ताल’.

तिथलं पाणी अतिशय थंड, स्वच्छ आणि निळसर होतं. काही काळ तिथेच थांबून त्या थंड पाण्याचा आनंद लुटून झिंग झिंग बार करत आम्ही संध्याकाळी सार्चूला पोहोचलो. खरंतर विचार केलेला 230 किमीचा प्रवास आहे. असा कितीसा वेळ लागेल… पण खूप जास्त वेळ लागतो. सार्चूला आमची टेन्टमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. तिथले टेन्टही अगदी सुंदर होते. मोठा बेड, रजाई, लाइट्‌स, आतमध्ये टॉयलेट बाथरूम, अगदी सगळंच.

डोंगरांच्या पायथ्याशी बांधलेल्या टेन्टसमोर बसून चहा पिण्याचा अनुभव कमाल होता. रात्री मोकळ्या आकाशात इतके तारे दिसतात म्हणून सांगू. तिथे रात्री भयंकर थंडी होती. पारा 2 पर्यंत घसरलेला होता. मी मूळची मुंबईची असल्याने पुण्याच्या थंडीतच मी गारठून जाते आणि इथे तर फक्‍त 2 अंश तापमान. सकाळपर्यंत माझी जवळपास कुल्फी झाली आणि टेन्ट मध्ये राहण्याची माझी हौस फिटली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.