दारूचा महापूर!

आतापर्यंत 70 हजार लिटर मद्य जप्त
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेरून अवैध शस्त्र, मद्य आणि पैशांची आवक होऊ नये, यासाठी ही नाकाबंदी असून आतापर्यंत शहरासह जिल्ह्यात तब्बल 70 हजारांहून अधिक लिटर मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस, ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई, परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करणे, भरारी पथकांकडून अचानक तपासणी अशी विविधी प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल निवडणूक आयोगाला दैनंदिन स्वरूपात पाठवण्यात येत आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकांकडे आलेल्या तक्रारींबाबत तीन दिवसांत चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्यामुळे कारवाईमध्ये पारदर्शकता आली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर अशा चार लोकसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातून 70 हजार लिटर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामधून 9 हजार 600 लिटर, बारामती 12 हजार लिटर, मावळ 32 हजार लिटर आणि शिरूर मतदार संघ क्षेत्रातून 16 हजार लिटर एवढा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पुणे-सोलापूर, सातारा, नगर, रायगड, नाशिक या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली असून सर्व जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय ठेवून कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 हजार 822 जणांकडे शस्त्र परवाने आहेत. ज्यांच्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकेल आणि ज्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे, असा व्यक्तीकडील शस्त्रे जमा करण्यात येत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.