विविधा : कवि सुधांशु

-माधव विद्वांस

‘इथेच आणि या बांधावर अशीच श्‍यामल वेळ’ हे सर्वांच्या तोंडी असलेले गोड गीत लिहिणारे कै. सुधांशु यांची आज जयंती. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कृष्णेच्या काठावरील नृसिंहसरस्वतीच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या औदूंबर येथे दिनांक 6 एप्रिल 1917 रोजी झाला. (निधन- 18 नोव्हेंबर, 2006) त्यांचे संपूर्ण नाव हणमंत नरहर जोशी, अर्थात काव्यतीर्थ कवी सुधांशु.

हे मराठीतील भावगीत व भक्‍तिगीते यांचेसाठी प्रसिद्ध आहेत. कवी कुंजविहारी यांनी त्यांना “सुधांशु’ हे नाव दिले आणि त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्यमधे पुढील प्रमाणे त्यांचा उल्लेख आहे. श्री. सुधांशु हे आमच्या कृष्णाकाठचे संवेदनशील प्रसिद्ध कवी आहेत.

आपल्या साध्या, पण संवेदनशील जीवनात रममाण असणारा हा कवी अवतीभोवतीच्या समाजजीवनात सहानुभूतीने समरस होणारा खराखुरा साहित्यिक आहे. त्यांच्या कवितांचे प्रसिद्ध झालेले छोटे छोटे काव्यसंग्रह यापूर्वीच मराठी वाचकांपुढे आलेले आहेत आणि त्या सर्व कविता मी पहिल्यापासून अत्यंत आवडीने वाचीत आलो आहे. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कवितांबद्दल मला वाटणारा जिव्हाळा मी येथे व्यक्‍त करीत आहे. काव्याच्या क्षेत्रात जाणता वाचक या नात्याखेरीज अकारण प्रवेश करण्याचा मला फारसा अधिकार नाही, हे मी जाणतो.

कवी सुधांशु यांचे काव्यलेखन इ.स. 1937 पासून सुरू झाले. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. या कवितांचे काव्यसंग्रह पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. रा. अ. कुंभोजकर यांनी सुधांशुंना एकदा “तुम्ही कवी कसे झालात?’ असे विचारले. त्यावर ते म्हणाले, “मी दोन मातांच्यामुळे कवी झालो. एक माझी जन्मदात्रीमाऊली आणि दुसरी कृष्णामाई. एकीने माझ्या अंत:करणात कवितेची बीजे रुजवली आणि दुसरीने आपल्या निर्मलतेने आणि समृद्धीने मला काव्यदृष्टी दिली.’ त्यांची राहणी अत्यंत साधी होती. आयुष्यभर त्यांनी खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. त्यांनी भारताच्या 1942 सालच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. आपल्या गीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्र्याचाही संदेश पोहोचविला.

अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिक त्यांच्याकडे गुप्तपणे मुक्‍कामाला येत असत. गावकऱ्यांचे कवी सुधांशुंवर असलेल्या प्रेमामुळे ही बातमी पोलिसांपर्यंत कधीच पोहोचली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स. 1960 मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि 1965 पर्यंत त्या पदावर राहिले.

पहिल्यांदाच ग्रामीण भागात एखाद्या साहित्यिकाला मिळालेला हा बहुमान असावा. त्यांच्या कार्यकाळात गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्‍तीचा पुरस्कारही मिळाला होता. अशा औदुंबरच्या कृष्णाकाठी 1937 साली सदानंद सामंत व हणमंत नरहर जोशी या दोन मित्रांनी गावात “बालशारदा मंडळ’ स्थापन केले. पण त्यांच्या मित्राचे आजारपणात निधन झाले. त्यांच्या मित्राच्या स्मरणार्थ “सदानंद साहित्य संमेलना’ला प्रारंभ केला. या संमेलनाला दत्तो वामन पोतदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आजही मकरसंक्रांतीला हे संमेलन भरविले जाते. भुकेला भक्‍तीला भगवान, गोकुळाला वेड लाविले, स्मरा स्मरा हो, देव माझा विठू सावळा, दत्तदिगंबर दैवत माझे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद इत्यादी भक्‍तिगीते आज सगळ्यांच्याच ओठावर आहेत. कृष्णेच्या काठावर असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणीच त्यांनी कायम वास्तव्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.