कलंदर : पाऊस

-उत्तम पिंगळे

काल प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो होतो त्यांनी तडक मला प्रश्‍न केला. पावसाबद्दल आपले काय मत? मला आधी प्रश्‍नच समजला नाही की, पावसाबद्दल मत म्हणजे तो जास्त झालाय, का कमी आहे, का अनियमित आहे, का फक्‍त मोजक्‍याच ठिकाणी पडत आहे व काही ठिकाणी अजिबातच पडत नाही. मी त्यांना तसे म्हणालोही.

त्यावर ते हसून म्हणाले तसे नाही हो, एकूणच पावसाबद्दल. आपण हे जाणतो पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. पण आता शहरीकरण एवढे वाढले आहे म्हणून मी विचार केला की दुसरीच्या मुलाला अशा पावसाळ्यावर निबंध साधारण दहा-बारा ओळी लिहिण्यास सांगितला तर तो काय लिहील?

मग त्यांनी त्यांच्या मुंबईत राहणाऱ्या दुसरीतील मुलाचा निबंध आणि त्यांच्या मित्रांकडून ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलाचा निबंध मला दाखवला.

मला त्याच्या आधी विचारले, तुम्हाला काय वाटते? त्यावर मी म्हणालो की, त्या मुलांना जे वाटत असेल ते त्यांनी लिहिले असेल. बरोबर आहे, असे ते म्हणाले व त्यांनी माझ्याकडे दोन्ही कागद दिले.

प्रथम ग्रामीण भागातील निबंध वाचू लागलो-
पाऊस…

मे महिन्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होताच आभाळ भरू लागते. आजा म्हणतो, आता वळिवाचा पाऊस सुरू होईल. मग आजा, बा, सर्वजण शेताची मशागत करून पेरणीसाठी तयार राहतात. पहिल्या पावसाने मातीचा सुगंध सर्वत्र पसरतो. मग, बा शेतात पेरणी करतो. आषाढी एकादशीला आजा विठोबापाशी मागणी मागतो की, पाऊसपाणी व्यवस्थित होऊन शेतात मायंदळ धान्य होऊ दे. कुणासबी उपाशी ठेवू नकोस. भूगोलात आहे की, समुद्राचे पाणी आकाशात जाऊन पाऊस पडतो. पावसाने मग शेत हिरवेगार दिसू लागते. लावणीच्या वेळी खूप पाऊस पडतो. कधी कधी शाळेला सुट्टीही मिळते. गावाच्या बाजूचे डोंगर हिरवेगार दिसू लागतात. पावसाळ्यात खूप सण येतात. नागपंचमी, गोविंदा, गौरी गणपती यावेळी शाळेला सुट्टी असते. आजा म्हणतो की, पावसामुळेच आपल्याला धान्य खाया मिळते व गायीगुरे शेळीमेंढी यांना चारा मिळतो. म्हणून पावसाला वरुण देव म्हणतात. आपल्या सर्वांना तो धान्य खाऊ घालतो व सणही असतात म्हणून मला पाऊस खूप आवडतो.

मग दुसरा मुंबापुरीतील दुसरीच्या मुलाचा मी निबंध वाचू लागलो-
पाऊस…

शाळा सुरू होत असतानाच पावसालाही सुरुवात होते. आभाळातून जोराने पाणी पडते त्याला पाऊस म्हणतात. पावसामुळे कॅबमधून जाताना दप्तर, पुस्तके व ड्रेस खराब होतो. कित्येक वेळा पाऊस खूप जोरात येतो मग, आमची कॅबही कधी कधी बंद पडते. खूप जोराचा पाऊस पडणार असेल तर शाळा व शहरातील ऑफिसनाही सुट्टी देतात. मग मला मम्मी पप्पांबरोबर घरात राहावे लागते व बाहेर पडता येत नाही. पावसामुळे सुट्टी मिळूनही मॉल वा मल्टिप्लेक्‍समध्ये आम्हाला जाता येत नाही. घरी जरी पिझ्झा, बर्गर मागवायचा असला तरीही तो पावसामुळे वेळेवर येऊ शकत नाही. दूधवाला भैयाही दूध आणत नाही म्हणून मग चॉकलेट फ्लेक्‍स्‌ पावडरच दुधातून खायला लागते. पाऊस नेमका शाळा भरताना आणि सुटताना का पडतो ते समजत नाही. आमच्या गाडीतही पाणी जाऊन कधी कधी गाडी खराब होते. म्हणून मला पाऊस अजिबात आवडत नाही.

आता यातील अमुकच बरोबर असे आपण ठरवू शकतो का?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.