विविधा : बाबा आमटे

-माधव विद्वांस

आज राष्ट्रसंत मुरलीधर देविदास तथा बाबा आमटे यांचे पुण्यस्मरण (निधन 9 फेब्रुवारी 2008). बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच घरात ‘बाबा’ या नावाने हाक मारली जायची.भविष्यातही ते दिनदुबळ्यांचे ‘बाबा’ झाले.

प्रस्तुत लेखकास सातारचे निवृत्त जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. कवारे यांचे बरोबर वरोरा येथील “आनंदवनातील आनंद’ अनुभवण्याचा योग आला. तेथील काम पाहून कवी बा.भ. बोरकरांची पुढील कविता आठवली “दिव्यत्वाची येथे प्रचीती… तेथे कर अमुचे जुळती.’ येथील सर्वच भव्य दिव्य आहे. हे अतिशय अवघड काम आहे कोणा सामान्याचे हे कामच नाही आणि यालाच अवतार म्हणतात.

बाबा गांधीजींच्या विचारांनी प्रेरीत होऊन स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. ‘वंदे मातरम’ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना 21 दिवस तुरुंगवास पत्करावा लागला. बाबा एकदा वरोरा येथे रेल्वेने जात असताना वाटेत एक इंग्रज अधिकारी एका महिलेची छेड काढीत होता ते पाहून बाबा तेथे गेले, व त्यास सुनावू लागले; पण तो ऐकेना. मग मात्र बाबा त्याच्या अंगावर धावून गेले व त्यास ठोसे लगावले व वर्धा येथे गाडी अडवून ठेवली. ब्रिटिश कमांडर तेथे आल्यावर बाबांना त्याने चौकशीचे आश्वासन दिल्यावरच गाडी पुढे गेली या धाडसाबद्दल महात्मा गांधीनीही त्यांचे ‘निर्भय व्यक्ती’ म्हणून कौतुक केले होते.

बाबां वकिली करीत होते.चांगला जम बसला होता. वडील सरकारी नोकरीत चांगल्या हुद्यावर होते. त्यांना पैसा प्रतिष्ठाही होती. कदाचित राजकारणात पडले असते तर कदाचित मंत्रिपदावरही गेले असते, पण बाबांनी मात्र खडतर मार्ग स्वीकारला. वरोऱ्यासारख्या आदिवासी भागात जाऊन राहण्याचा निर्णय खूप धाडसाचं होता या त्याच्या पत्नीचीही साथ होती.

बाबांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा तुळशीराम नावाचा एक कुष्ठरोगी पाहिला. त्यांनी त्याला घरी आणले सुरवातीला त्यांना भीतीही वाटली. पण भीती झटकून कुष्ठरोगाचा अभ्यास केला. मागील जन्मीच्या पापांमुळे कुष्ठरोग होतो ही अंधश्रद्धा तेव्हा समाजात होती. त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे इ.स. 1949-50 या कालावधीत फक्त डॉक्‍टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

मग पत्नी साधनाताईंनी बाबांच्याबरोबर जंगलाची वाट धरली.वर्ष 1952 मधे त्यांनी सरकारकडून मिळालेल्या 50 एकर जमिनीवर स्वतःकडे असलेले चौदा रुपये व एक आजारी गाय व सहा कुष्ठरोगी यासह प्रकल्प सुरु केला आजमितीला 440 एकर जमिनीवर 3500 लोकांना हा आश्रम आधारघर ठरला आहे. बाबानी या कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन प्रकल्प बरोबर नर्मदा बचाओ आंदोलन तसेच पंजाबातील आतंकवाद शमविण्यासाठी “भारत जोडो’ अभियानही राबवले. बाबांची मुले सुना नातवंडेही त्यांच्या कार्यात भाग घेत आहेत.

आनंवदवन आश्रमात असलेल्या पीडितांना व बाबांच्या कुटूंबातील व्यक्तींना तसेच अभ्यागतांना एकाच स्वयंपाक घरातील जेवण दिले जाते. येथे येणारा आश्रित स्वतःच्या पायावर उभा राहण्याची क्षमता प्राप्त करतो,तो स्वावलंबी होतो. आश्रमात हातमाग तसेच अनेक कुटिरोद्योग शिकविले जातात.

बाबांच्या पश्‍चात डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे हेमलकसा येथील लोकबिरादरी हा प्रकल्प सांभाळतात. डॉ.विकास आमटे वरोऱ्याची जबाबदारी सांभाळतात. बाबांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले तसेच भारत सरकारने वर्ष 1986 मधे पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.