आपला चातुर्मास : गो दर्शन आणि गो दान

-अरुण गोखले

लक्ष्मीनारायणाच्या पद्मपुराणातील संवादातून या महिन्यातील गो दर्शन, गो पूजन आणि गो दानाच्या संदर्भात जी माहिती आलेली आहे ती अशी आहे-

एकदा लक्ष्मीने प्रश्‍न केला की “”स्वामी! जे लोक दरिद्री आहेत, शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांना कोणत्या साध्या सोप्या उपायाने पदरी पुण्य जोडता येईल? त्यावर भगवान म्हणाले की, “अशा लोकांनी या अधिकमासात लवकर उठावे, स्नान करावे, देवदर्शन घ्यावे, देवाचे नामस्मरण करावे. त्याबरोबरच रोज नित्यनेमाने गोमातेचे दर्शन घ्यावे.

नारायण देवीस असेही सांगतात की, गो मातेचे दर्शन, तिला घास भरवणे, तिची पूजा करणे ह्यासारख्या सोप्या उपायांनीही लोकांना या मासात अधिक पुण्य आपल्या गाठीस बांधता येते. गाईचे शेण, गोमूत्र, पंचगव्य ह्या गोष्टी अतिशय शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांच्या वापराने मानवी जीवनात बाह्य आणि अंतरिक शुद्धता घडते. गायीचे दर्शन घेतल्याने, तिला गो ग्रास दिल्याने, तिची पूजा केल्याने पुण्य पदरी पडते. तसेच जे श्रीमंत, धनिक आहेत त्यांनी गो दान करावे, असेही शास्त्राने सांगितले आहे. गो दान हे मोठे पुण्यकारक आहे. पण असे गोदान कसे करावे? गाय कोणास दान करावी? ह्या संदर्भातही इथे विशेष मार्गदर्शन केलेले आहे.

भगवान सांगतात की, गो दानाचे दात्यास मोठे पुण्य मिळते. पण ते कुणाला? तर जो चांगली दुभती, सवत्स आणि धष्टपुष्ट अशी गाय गरजू व्यक्‍तीस दान देतो त्याला. गो दान करीत असताना गायीस छान शृंगारावे, तिच्या गळ्यात घंटा बांधावी, तिचे पूजन करून ती विधिवत संकल्प करून दान द्यावी.
सध्याच्या काळात असे प्रत्यक्ष गो दान करणे ज्यांना शक्‍य नसते, असे लोक धातूच्या सवत्सधेनू मूर्ती जामातास श्रीकृष्ण स्वरूप मानून दान करतात आणि पुण्य पदरी जोडतात.त्यामुळे या महिन्यातले गो पूजन, दर्शन आणि गोदान यातील ज्यास जे शक्‍य असेल ते त्याने श्रद्धापूर्वक अवश्‍य करावे आणि पुण्य पदरी जोडावे.

Leave A Reply

Your email address will not be published.