पिरंगुट -कृष्णा फूड याठिकाणी पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. या कारवाईत एकूण 10 लाख 73 हजार 650 रुपयांचा भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त करण्यात आला. पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिरंगुट हद्दीत उरवडे रस्त्यावरील कोकाकोला कंपनीजवळील कृष्णा फूड्स येथे भेसळयुक्त खवा व बर्फी बनवली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पौड पोलीस व अन्न औषध प्रशासनाने छापा टाकून भेसळयुक्त बर्फी, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती व पामतेल असा एकूण 10 लाख 73 हजार 650 रुपयांचा साठा जप्त केला तसेच सुमारे दोन टन तयार बर्फी जप्त करीत हा माल जागेवरच नष्ट करण्यात आला.
नियम व अटींचे पालन केले नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने हा व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, हवालदार रॉकी देवकाते, पोलिस नाईक सिद्धेश पाटील, साहिल शेख तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गायकवाड, सोपान इंगळे यांनी ही कारवाई केली.
दुकानांमध्ये विक्री
हा भेसळयुक्त खवा व त्यापासून बनविलेले इतर पदार्थ हे पिरंगुट, घोटावडे फाटा, भुकुम, भुगाव तसेच तालुक्यातील विविध ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले होते. जप्त केलेला व नष्ट केलेला मालही विक्रीसाठी जाणार होता.