रायपूर – केंद्र सरकार कडून ईडीचा राजकीय कारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप सतत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा आता कॉंग्रेस शासित छत्तीसगड मध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी मनी लॉंड्रिंग तपासाचा एक भाग म्हणून त्या राज्यातील काही आयएएस अधिकारी आणि एका कॉंग्रेस नेत्याच्या घराची झडती घेतली.
आयएएस अधिकारी राणू साहू, इतर काही सनदी अधिकारी आणि छत्तीसगड कॉंग्रेसचे नेते व प्रदेश कॉंग्रेसचे खजिनदार यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. कोरबा महानगरपालिका आयुक्त प्रभाकर पांडे यांच्यासह अन्य काही उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर कारवाई करण्यापुर्वी त्यांच्या घरांवर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
हे छापे नेमके कोणत्या प्रकरणात टाकण्यात आले हे कळू शकले नाही, परंतु सूत्रांनी सांगितले की याचा संबंध तांदूळ घोटाळ्याशी असू शकतो. ईडीकडून सध्या राज्यातील कथित कोळसा गैरव्यवहार आणि मद्य घोटाळ्याची चौकशी सुरू आहे ज्यामध्ये राजकीय नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांव्यतिरिक्त प्रमुख नोकरशहांना अटक करण्यात आली आहे.