सातारा -प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 1 ली ते 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव देण्यासाठी ऑनलाइनच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर (शिक्षणाधिकारी-माध्यमिक) व प्रभावती कोळेकर (शिक्षणाधिकारी – प्राथमिक) यांच्या संकल्पनेतून प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कला विषयांतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील व भेटकार्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर शिक्षकांना या कार्यशाळेची माहिती मिळण्यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, मंगल मोरे, ग्यान प्रकाश फौंडेशनचे प्रशांत भोसले यांची उपस्थिती होती. कला संघ महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी स्वागत केले.
मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने दिवाळीनिमित्त आकाशकंदील पर्यावरणपूरक कसे बनवावे या संदर्भात श्री शिवाजी विद्यालय कराडचे कुमार सुतार यांनी माहिती देत प्रात्यक्षिके दाखविले. तीन प्रकारचे आकाशकंदील तयार करुन दाखवित असताना आकाराचे प्रमाण, रंगसंगती इ. माध्यमातून आकर्षक आकाश कंदील तयार करुन दाखविले. सतीश गायकवाड यांनी भेट कार्ड तयार करण्यासाठी त्याची सर्व माहिती दिली. सतीश गायकवाड यांनी टाकाऊ कागदाच्या तुकडयापासून भेट कार्ड सुंदर आकर्षक तयार करुन दाखविले.
पर्यावरण पूरक आकाशकंदील व भेट कार्ड कार्यशाळेस राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. त्यांनी सांगीतले की कला शिक्षकांना कला, कार्यानुभव विषयांतर्गत असणाऱ्या विविध उपक्रमांसाठीनेहमी पाठबळ देऊ, या दिवाळी सुट्टीच्या आणि करोना-19 च्या काळात विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक आकाशकंदील व भेटकार्ड तयार करण्यासाठी या कार्यशाळेचे नियोजन करण्यास मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा झूम ऍपवर ऑनलाइन झाली. त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण प्राथमिक शिक्षण विभाग या फेसबुक पेजवर प्रशांत भोसले यांनी केले. प्रदीप कुंभार यांनी तंत्रसहाय्य केले.